आडुर पंचक्रोशीतील ज्येष्ठ व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड
कोल्हापूर प्रतिनिधी
आडूर (ता. करवीर) येथील श्रीमती येसाबाई विष्णू कांबळे (वय 103) यांचे मंगळवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी (दि. 24) सकाळी 9 वाजता आडुर येथे आहे. भाकपचे शहर सचिव आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनचे सचिव कॉ. रघुनाथ कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.
येसाबाई कांबळे यांचा आडुर पंचक्रोशी दांडगा जनसंपर्क होता. साधी राहणी, साधा आहार हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य होते. त्यांचे पती विष्णू कांबळे येथील जुन्या काळातील शेतकरी होते. गावातील भजनी मंडळ आणि बँड पथकाच्या माध्यमातून विष्णू कांबळे कार्यरत होते. सामाजिक कामातही त्यांचा सहभाग होता. पाच वर्षांपूर्वी त्यांचे वयाच्या 102 व्या वर्षी निधन झाले होते. पती विष्णू कांबळे यांच्याप्रमाणे येसाबाई कांबळे यांनी देखील वयाची शंभरी पूर्ण केली. रघुनाथ कांबळे यांच्यासह साताप्पा, तुकाराम, भगवान ही मुले वृत्तपत्र, शेती व खाद्यपदार्थ विक्री व्यवसायात कार्यरत आहेत. त्याचबरोबर नातवंडेही नोकरी, व्यवसायात आहेत.









