प्रतिनिधी /येळ्ळूर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येळ्ळूर येथील माजी सैनिकांचा सत्कार सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल स्कूलच्यावतीने करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायत सदस्यांचाही सत्कार केला. 1962, 1965 आणि 1971 सालामध्ये झालेल्या युद्धांमध्ये भाग घेतलेल्या सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष उत्तम खेमनाकर होते.
प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ता. पं. माजी अध्यक्ष रावजी पाटील यांच्या हस्ते, सरस्वती प्रतिमा पूजन ग्रा.पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. माजी सैनिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळा शिक्षणतज्ञ समितीचे अध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांनी पूजन केले. प्रभारी मुख्याध्यापिका एस. आर. निलजकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
माजी सैनिक गोविंद पाटील, दत्तात्रय पाटील यांनी देशसेवा करताना झालेल्या प्रवासाचे वर्णन केले. युद्धामध्ये कशा प्रकारे काम करावे लागते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याचबरोबर देशसेवेसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. सीआरपी महेश जळगेकर यांनीही मार्गदर्शन केले. शाळेच्या प्रगतीबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. दुद्दाप्पा बागेवाडी यांनी शाळेला मैदान नसल्याने ग्राम पंचायतीने ते उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
या कार्यक्रमामध्ये ग्राम पंचायत सदस्य अरविंद पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. अध्यक्ष उत्तम खेमनाकर यांनी शाळेच्या विकासाबाबचा आढावा घेऊन सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य, माजी सैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. व्ही. पाखरे यांनी तर शिक्षिका एच. आर. अरेर यांनी आभार मानले.









