सहा महिन्यांपासून काम रखडलेलेच, कंत्राटदार आणि ग्राम पंचायतीच्या कारभारावर नाराजी
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील टिळक रोडची खोदाई करून सहा महिने उलटले तरी त्या रस्त्याकडे कंत्राटदाराने फिरकुन पाहिले नाही. यातच पाण्याची पाईप फुटून पाणी वाया जात असल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. उन्हाळय़ात देखील या रस्त्यावर चिखल होत आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि ग्राम पंचायतबद्दल या परिसरातील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
परमेश्वरनगरपासून सांबरेकर गल्ली तसेच इतर गल्ल्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याची रुंदीही मोठी आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी खोदाई करण्यात आली. मात्र कंत्राटदार कासवापेक्षाही संथगतीने काम करत आहे. यातच ग्राम पंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे पाण्याची पाईप फुटून पाणी वाया जात आहे. यातच रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामातील काळी माती देखील त्या ठिकाणी टाकण्यात आली. त्यामुळे आणखीनच चिखल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उन्हाळय़ात अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळय़ापर्यंत हा रस्ता पूर्ण झाला नाही तर ये-जा कशी करायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पाण्याच्या पाईप फुटण्यामुळे तर वारंवार पाणी रस्त्यावरून वाहत आहे. अनेकांच्या घरातही पाणी शिरले आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रा. पं. माजी सदस्य तानाजी हलगेकर, ग्रा. पं. माजी सदस्य रमेश धामणेकर यांच्यासह इतर नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र ग्रा. पं. आणि कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गावचा विकास झाला असे सांगितले जात आहे. मात्र या रस्त्याची अवस्था पाहता गावचा विकास झाला आहे का? असा प्रश्न ग्राम पंचायत माजी सदस्यांनी व नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा रस्ता रुंद आहे. तसेच या रस्त्यावर पाणी देखील साचणार नाही. मात्र त्याची योग्यप्रकारे देखभाल करणे गरजेचे आहे. काँक्रिटीकरण करा पण ते वेळेत करा. पाण्याचे पाईप वारंवार फुटत आहे. त्याची एकदाच दुरूस्ती करा, अशी मागणी देखील या ग्राम पंचायतचे माजी सदस्य व नागरिकांनी केली आहे.
काही तांत्रिक अडचणींने समस्या – ग्रा.पं.सदस्य प्रमोद पाटील
या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. कंत्राटदार लक्ष देण्यास तयार नाही. याबाबत ग्राम पंचायतीच्या माध्यमातून वारंवार त्यांना सूचना केली आहे. मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. यातच पाण्याची पाईप फुटत आहे. दोन ते तीनवेळा आम्ही दुरुस्ती केली. तरीदेखील ती पाईप फुटत असल्याने समस्या निर्माण होत आहेत. लवकरच पाण्याच्या पाईपची दुरूस्ती करू, असे त्यांनी सांगितले. तातडीने टाकण्यात आलेली माती देखील ट्रक्टर व जेसीबीच्या सहाय्याने हटविल्याचे त्यांनी सायंकाळी सांगितले.









