1 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज लांबविला : ग्रामस्थांना मोठा धक्का, चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याची मागणी

प्रतिनिधी /येळ्ळूर
गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये पुन्हा चोरीचा प्रकार घडल्याने साऱयांनाच धक्का बसला आहे. चोरटय़ांनी देवीच्या गळय़ातील मंगळसूत्र, चांदीचे दागिने चोरून नेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपली छबी येणार म्हणून सीसीटीव्हीचे साहित्यही चोरटय़ांनी लांबविले आहे. यामुळे हे चोरटे माहितगारच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दुसऱयांदा या जागृत देवस्थानात चोरी झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. चोरटय़ांनी गाभाऱयावरील कडी, फळय़ा काढून गाभाऱयात प्रवेश केला. त्याठिकाणी श्री चांगळेश्वरी देवीच्या अंगावरील मंगळसूत्र व चांदीचा छल्ला असा एकूण 84 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. जाताना सीसीटीव्हीचे साहित्य असलेल्या खोलीचा कुलूप तोडून त्यामधील सीसीटीव्हीची संपूर्ण सिस्टिमच चोरटय़ांनी पळवून नेली आहे, असे एकूण 1 लाख 14 हजाराचे साहित्य लांबविले आहे.
एक वर्षापूर्वी चोरी झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र आता चोरटय़ांनी हे साहित्यही लांबविले आहे. यावरून हे चोरटे माहितगारच असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले पण श्वान मंदिरापासून काही अंतरावरच घुटमळले.
चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चांगळेश्वरी ट्रस्टचे सचिव वाय. सी. इंगळे, शांताराम कुगजी, तानाजी हलगेकर, दुद्दाप्पा बागेवाडी, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य रमेश मेणसे, अरविंद पाटील, शशीकांत धुळजी, सुनील अरळीकट्टी, राजू पावले, दौलत कुगजी, मनोहर पाटील, आनंद पाटील, शंकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याची मागणी
श्री चांगळेश्वरी देवी ही ग्रामदेवता आहे. या मंदिरात कधीच चोरीचा प्रकार घडला नव्हता. मात्र दीड वर्षात दोन वेळा चोरी घडल्याने येळ्ळूरवासियांना मोठा धक्का बसला आहे. जागृत देवस्थानमध्ये चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर यावेळी तीव्र संतापही व्यक्त होताना दिसत होता. या चोरटय़ांचा तातडीने बंदोबस्त करा, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांना केली आहे.
भक्तांनी तातडीने केली मदत
श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडल्याने साऱयांच्याच जिव्हारी लागले. भक्तांनी तातडीने आर्थिक मदत केली. कलमेश्वर गल्लीतील परशराम यल्लाप्पा कुंडेकर यांनी 5051 रुपये, प्राध्यापक सी. एम. गोरल 5001 रुपये दिले. तर ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांनी चांदीचा छल्ला देणगीदाखल दिला.









