@ प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूरमध्ये रविवार दि. 2 रोजी 15 वे मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा वृद्धिंगत करण्याचे काम केले जात आहे. दरवषी येळ्ळूरचे संमेलन म्हणजे एक आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे. सर्व ती तयारी पूर्ण झाली आहे. श्रोत्यांसाठी भव्य शामियानाची उभारणी करण्यात आली आहे.
परमेश्वरनगर येथील येळ्ळूरवाडी शाळेच्या प्रांगणामध्ये हे संमेलन होत आहे. महात्मा गांधी संमेलन नगरीमध्ये साहित्याचा जागर होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पोलीस महासंचालक उद्धव कांबळे हे राहणार आहेत. सकाळी 8.30 वाजता महाराष्ट्र हायस्कूलजवळ ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10.30 वाजता उद्घाटन, स्वागताध्यक्षांचे भाषण त्यानंतर उद्धव कांबळे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.
दुसरे सत्र दुपारी 1.15 ते 2 यावेळेत होणार असून त्यामध्ये कॉ. मेधा सामंत पुणे हे मनोगत व्यक्त करणार आहेत. दुपारी 2 ते 2.45 यावेळेत अल्पोपहार होणार आहे. त्यानंतर तिसरे सत्र दुपारी 2.45 ते 3.30 वाजता होईल. यामध्ये कथाकथन स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे. सत्र चौथे यामध्ये 3.30 ते 4.30 यावेळेत कवी संमेलन होणार आहे. सुरेश मोहिते हे कथा कवितेच्या जन्माची यावर कविता सादर करणार आहेत.
पाचव्या सत्रामध्ये ज्ये÷ सिने अभिनेते सचिन खेडेकर हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. ग्राम देवतेचे पूजन एपीएमसीचे माजी अध्यक्ष आप्पा जाधव, शिवप्रतिमा पूजन जयराज हलगेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन विजय धामणेकर, महात्मा गांधीजी संमेलननगरीचे उद्घाटन सुधीर दरेकर, दिवंगत के. बी. निलजकर प्रवेशद्वाराचे उद्घाटन जि. पं. सदस्य रमेश गोरल, दिवंगत दत्ता हट्टीकर ग्रंथालयाचे उद्घाटन एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, दिवंगत यल्लाप्पा मेणसे सभामंडपाचे उद्घाटन एपीएमसी सदस्य आर. के. पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
स्वामी विवेकानंद विचारपीठाचे उद्घाटन निवृत्त शिक्षणाधिकारी सी. एल. कंग्राळकर, महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमेस पुष्पहार ऍड. शाम पाटील, मुकुंद घाडी यांच्या हस्ते अर्पण करण्यात येणार आहे. तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन, ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन नारायण काकतकर, संत तुकाराम प्रतिमापूजन ऍड. सुधीर गावडे, गुरुवर्य गावडोजी पाटील प्रतिमा पूजन नागनाथ जाधव तर राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन दुद्दाप्पा बागेवाडी यांच्या हस्ते होणार आहे.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, उपाध्यक्ष रमेश धामणेकर, सुभाष मजुकर, कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, सचिव डॉ. तानाजी पावले यांच्यासह इतर सर्व सदस्य संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.









