मेडिकल्स, दवाखाने वगळता इतर व्यवसायांवर बंदी
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर ग्राम पंचायत टास्क फोर्स कमिटीने मंगळवारपासून येळ्ळूरमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून गावकऱयांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 18 पासून सोमवार दि. 24 पर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. या काळात केवळ दवाखाने, मेडिकल दुकाने सुरू राहतील. सकाळी 6 ते 9 या वेळेत सरकारी रेशन दुकाने आणि दूध डेअरी सुरू राहतील. तेथेही सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी करावी लागणार आहे. इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात जनतेने घराबाहेर पडू नये, मोटारसायकल घेऊन कोणीही विनाकारण बाहेर पडले तर त्याचे वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
विनामास्क फिरणाऱयांवरही कारवाई केली जाणार आहे. कोरोना रुग्ण वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून ग्राम पंचायतीमध्ये बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. टास्क फोर्स कमिटीचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, पीडीओ अरुण नाईक, ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, दयानंद उघाडे, अरविंद पाटील, विलास बेडरे, राजू डोण्यान्नावर, परशराम परीट, जोतिबा चौगुले, सुनील अरळीकट्टी, रूपा पुण्यान्नावर, सुवर्णा बिजगरकर, मनीषा घाडी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रमेश दंडगी, येळ्ळूर गावचे बीट हवालदार बाळेश, ग्रा. पं. कर्मचारी उदय हुंदरे, शिवाजी हुवाण्णावर, शांता हुवाण्णावर आदी उपस्थित होते.
आज तातडीची बैठक सोमवार दि. 17 रोजी ग्राम पंचायतीमध्ये सकाळी 10 वाजता तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. टास्क फोर्स कमिटीचे सभासद, सर्व डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांनी उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे. या बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत रुपरेषा ठरविण्यात येणार आहे.









