पुन्हा खटला पुढे ढकलला : पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी
प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूर महाराष्ट्र राज्य फलक हटविणे व त्यानंतर मारहाण करून गुन्हा दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी तब्बल 7 वर्षे न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे येळ्ळूरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी या खटल्याची तारीख होती. मात्र पाच खटल्यांतील 12 जणांना वॉरंट असल्यामुळे खटला चालू शकला नाही. त्यामुळे 10 फेब्रुवारी 2023 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तेव्हा त्या बारा जणांनी वकिलांशी संपर्क साधून वॉरंट रिकॉल करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा खटला तसाच प्रलंबित राहणार आहे.
येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर येळ्ळूरच्या काही तरुणांवर, महिलांवर आणि ज्येष्ठांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण 5 खटल्यांमध्ये 156 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी शनिवारी होती. मात्र ती पुढे ढकलली आहे. केवळ काही जणांना वॉरंट असल्यामुळे हा खटला चालला नाही. तेव्हा याचा त्यांनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये खटला क्रमांक 122/15 मध्ये 47 जणांवर गुन्हा त्यामधील 3 जणांना वॉरंट, खटला क्रमांक 166/15 मध्ये 30 जणांवर गुन्हा 4 जणांना वॉरंट, 794/15 मध्ये 10 जणांवर गुन्हा 1 जणाला वॉरंट, 306/15 मध्ये 43 जणांवर गुन्हा 3 जणांना वॉरंट, 167/15 मध्ये 26 जणांवर गुन्हा 1 जणावर वॉरंट आहे. त्यामुळे खटला पुढे चालविणे अवघड आहे. त्यासाठी प्रथम रिकॉल करणे गरजेचे आहे.
गेली सात वर्षे साऱ्यांना न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये हा खटला सुरू आहे. मात्र गैरहजर असल्यामुळे साऱ्यांनाच त्याचा त्रास होत आहे. तेव्हा वॉरंट असलेल्या व्यक्तींनी अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंच्चन्नावर यांच्याशी संपर्क साधून रिकॉल करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.