वार्ताहर / मायणी :
वाढत्या थंडीबरोबर गुलाबी फ्लेमिंगोचे (रोहीत) येरळवाडी (ता.खटाव) येथील तलावात आगमन झाले आहे. थंडीत दाखल झालेल्या परदेशी पाहुण्यांमुळे पक्षीमित्रांच्या आनंदाला उधाण आले आहे. तर येथील तलावात स्थानिक पक्षांचाही किलबिलाट वाढला आहे.
खटाव तालुक्यात येरळवाडी, मायणी, कानकात्रे व सुर्याचीवाडी तलावात हे रोहीत पक्षी थंडीत वास्तव्यात येतात. यातील सुर्याचीवाडीत यावर्षी पाणीसाठा न झाल्याने येरळवाडीत लेसर फ्लेमिंगो व फ्लेमिंगो अशा एकूण 40 ते 45 पक्षांचे आगमन झाले आहे. पेरू, चिली, मंगोलीया, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत तर भारतात कच्छच्या रणात फ्लेमिंगो मोठय़ा प्रमाणात आढळतात. या भागात पडणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हे पक्षी दुष्काळी तालुक्यात हजेरी लावतात. त्यांचे निरिक्षण करण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, कराड आदी ठिकाणांसह स्थानिक भागातून पक्षीमित्र तलावावर दाखल होतात. सद्या वडूजपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या येरळवाडी तलावात सुमारे 40 ते 45 फ्लेमिंगो दाखल झाले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे पक्षी खटाव -माणच्या तलावावर दाखल होतात. फ्लेमिंगोंची उंची सुमारे चार ते पाच फूट असते. गुलाबी पाय, बाकदार इंग्रजीतील ‘एस‘ आकारासारखी मान, वरुन पांढरा रंग आतून गुलाबी पंखाचा रंग असणारे फ्लेमिंगो पाहण्यासाठी पक्षीप्रेमी उत्सुक असतात.
सध्या तलावात नदीसुरय, स्पून बिल, चक्रांग बदक, कांडेसर, चित्रबलाक, कवडय़ा खंडय़ा, चांदवा, पांढरा-पिवळा परीट, पाणकावळा, पाणबुडी, शराटी, शेकाटय़ा, खंडय़ा, कवडय़ा, शेकाटय़ा, तुतारी, तिमळी, पाणपाकोळी, पाणकाडय़ा बगळा, राखी बगळा आदी पक्षी दाखल झाले आहेत.