ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये जवळपास 70 हजार नागरिकांना बनावट कोरोना लस दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इक्वाडोरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी तेथील स्थानिक मीडियाला यासंदर्भात माहिती आहे.
इक्वाडोरमधील एका प्रायव्हेट क्लिनिकमध्ये 1100 रुपयांमध्ये नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती. या लसीचे तीन डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढून कोरोनापासून पूर्ण संरक्षण होईल, असा दावा या क्लिनीककडून करण्यात येत होता. तीन डोसद्वारे हे क्लिनिक प्रत्येक नागरिकांकडून 3300 रुपये उकळत होते.
एका व्यक्तीने यासंदर्भात काढलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या व्हीडीओत महिला डॉक्टर लुसिया पेनाफील मास्कशिवाय क्लिनिकमध्ये वावरताना दिसत आहे. या क्लिनिकमधील प्रत्येक कर्मचारी कोरोनापासून संरक्षित असल्याचा दावाही तिने केला आहे. आरोग्य विभागाने धाड टाकल्यानंतर तिने कोरोना लस देत नसल्याचा दावा केला आहे.









