आशियातील कंपन्यांचा समावेश : जीएसएमएची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशिया प्रशांत क्षेत्रातील मोबाईल कंपन्या 2020 पासून 2025 पर्यंत नेटवर्क उभारणीसाठी जवळपास 29.84 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. यातील जवळपास दोन तृतीयांश हिस्सा म्हणजे 331 अब्ज डॉलरपेक्षा अधिक (जवळपास 24.7 लाख कोटी रुपये) खर्च 5 जी नेटवर्क उभारणीवर करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग संघ जीएसएमने दिली आहे.
आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये 2019 पर्यंत 2.8 अब्ज मोबाईल ग्राहक होते. यामध्ये 2025 पर्यंत 26.6 कोटी इतकी वाढ होणार असल्याचा अंदाज मांडला आहे. संपूर्ण जगभरात आगामी 5 वर्षात जितके मोबाईल ग्राहक निर्माण होणार आहेत, त्यामधील निम्मे ग्राहक हे आशिया प्रशांत क्षेत्रातील राहणार असल्याचा अंदाज नोंदवण्यात आला आहे. आशिया प्रशांतमध्ये भारतासोबत इतर देशांमध्ये 4 जी नेटवर्कचा प्रामुख्याने उपयोग केला जात आहे. यामध्ये मार्च 2020 पर्यंत जपानसह अन्य 9 देशांनी व्यावसायिक मोबाईल 5 जी नेटवर्कची सेवा सादर केली आहे. तसेच 12 अन्य देशांनी 5 जी सेवा सुरु करण्यासाठीची औपचारिक घोषणा केली आहे. साधारणपणे आशिया प्रशांत क्षेत्रात सध्या 4 जीचा वापर बऱयापैकी सर्वत्र होत आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यात प्रामुख्याने बांगलादेश, भारत, इंडोनेशिया आणि पाकिस्तान आदींचा समावेश असल्याची माहिती आहे. उभरत्या बाजारातील देशामध्ये डिजिटल इकोसिस्टमचा विकास करण्यासाठी तेजी आणण्यावर भर देण्यासाठी मोबाईल ग्राहकांची संख्या वाढवण्यासोबत ब्रॉडबँडचा वापर वाढविणे आवश्यक आहे.









