प्रतिनिधी/ सांगे
गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकांत भाजपने उत्तम कामगिरी केली असून रिवण जि. पं. मतदारसंघातही दणदणीत विजय मिळविला. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सांगे मतदारसंघातून निश्चित भाजप जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगे येथे कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
संपूर्ण गोवाभर भाजप कार्यकर्ता प्रशिक्षणवर्ग चालू आहेत. 20 मतदारसंघांत वर्ग पूर्ण झाले असून ही 2022 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अंत्योदय तत्त्वावर शेवटच्या घटकापर्यंत गेले पाहिजे. सरकारचा तसा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कार्य करावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
बंद असलेल्या बेंडवाडा-सांगे येथील पुलाच्या बांधकामाविषयी विचारले असता सावंत म्हणाले की, माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले म्हणून हे काम बंद नाही. कोविड-19 मुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा परिणाम झाला. पुलाचे काम झाले, तर त्याचे श्रेय निश्चितच माजी आमदार फळदेसाई, माजी आमदार वासुदेव गावकर आणि जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांना जाणार आहे. कारण सरकार भाजपचे आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती समजून न घेता जे आंदोलन करतात त्यांची स्थिती खाज एकीकडे व खाजवणे दुसरीकडे अशी आहे
सांगेत आदिवासी संशोधन संस्था प्रकल्प आणणार
विविध प्रकारची सरकारी कामे घेतलेल्या कंत्राटदारांना 150 कोटींच्या थकीत बिलांची काही रक्कम चुकती केली असून 15 जानेवारीपर्यंत राहिलेली रक्कम चुकती केली जाईल. हाती घेतलेली 100 टक्के कामे मार्गी लागतील, असे सावंत यांनी स्पष्ट केले. केंद सरकारच्या मदतीने सांगे मतदारसंघात आदिवासी संशोधन संस्था हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून एका महिन्यात त्याचे काम चालू केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या खासगी कर्मचाऱयाने आंदोलन करणे चुकीचे
पुलाच्या बाबतीत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना सावंत म्हणाले की, सुभाष फळदेसाई हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. मेश्यू डिकॉस्ता यांना आपण ओळखत नाही. तसेच एखाद्या मंत्र्यांचा खासगी कर्मचारी सरकारच्या विरोधात आंदोलन करत असेल, तर ते चुकीचे आहे. कारण तो सरकारी पगार घेतो. त्यामुळे तो तसे करू शकत नाही.
संजीवनी बंद होणार नाही
संजीवनी व ऊस उत्पादकांबद्दलच्या सरकारच्या भूमिकेविषयी विचारले असता सावंत म्हणाले की, सांगेतील ऊस उत्पादक शेतकऱयांनी आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. कारण संजीवनी साखर कारखाना सहकार खात्याकडून कृषी खात्याकडे वर्ग केला. संजीवनी बंद करणार नाही हे पुन्हा एकदा आपण स्पष्ट करतो. संजीवनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षे लागू शकतात. शेतकऱयांना उभ्या ऊसाची नुकसान भरपाई म्हणून पहिल्या वषी रु. 3000, दुसऱया वषी रु. 2800 व तिसऱया वषी रु. 2600 असा भाव देण्याचे सरकारने ठरविले आहे.
संजीवनी व ऊस उत्पादकांमध्ये करार होणार
संजीवनी कारखाना व ऊस उत्पादक यांच्यामध्ये वैयक्तिक पातळीवर करार केला जाईल. सध्या कराराचा मसुदा कायदा खात्याकडे असून तो मंजूर होऊन आल्यानंतर करार केले जाणार. तीन वर्षांत कारखाना चालू केला जाईल, असे सांगून संजीवनी व पुलाच्या विषयांवर विनाकारण राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले.
नेत्रावळी सरपंचपदाच्या विषयात लक्ष घालणार
नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील अपूर्ण राहिलेल्या दोन कामांबद्दल कंत्राटदारावर खात्याकडून कारवाई का होत नाही असे विचारल्यावर पाण्याच्या टाकीसंदर्भात 15 दिवसांत कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच नेत्रावळी पंचायतीला दोन सरपंच लाभले असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता वर्तमानपत्रात आपण हे प्रकरण वाचले असल्याचे सांगून त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आपण लवकरच एका दिवसाचा सांगे मतदारसंघाचा दौरा करणार असून जी कामे पूर्ण झाली आहेत त्यांचे उद्घाटन करण्यात येईल. खाणी सुरू करण्यासाठी सरकार 100 टक्के प्रयत्न करत असून गांभीर्याने योग्य तो पाठपुरावा करत आहे, असेही सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सुभाष फळदेसाई, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, रजनी गावकर, सुभाष वेळीप हजर होते.









