गुंगीचे औषध देवून कृत्य, अश्लिल फोटो, व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक, दोन दिवस पोलीस कोठडी
इस्लामपूर / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथे एका २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर अतुल बाजीराव पाटील(४२) याने बलात्कार केल्याची घटना घडली. अश्लील फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देवून तो या मुलीस व कुटुंबियांना ब्लॅकमेल करीत होता. पोलिसांनी संशयित आरोपी पाटील याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अतुल पाटील याचे या तरुणीच्या घरी येणे-जाणे होते. दरम्यान त्याने सुरुवातीस या तरुणीस बिर्याणीमधून गुंगीचे औषध दिल्याने तिला चक्कर आली. बेशुद्ध झाल्यानंतर त्याने या तरुणीवर बलात्कार केला. दरम्यान पाटील याने शारीरिक संबंधाचे फोटो व व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची भीती घालून त्याने या तरुणीच्या राहत्या घरी व कासेगाव येथील हॉटेल ओमसाई मध्ये वारंवार बलात्कार केला. हा प्रकार मे २०१९ पासून सुरु आहे.
या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यास विचारणा केली असता,त्यांनाही फोटो,व्हिडीओची भीती घालून मुलीचे लग्न होवू देणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी मुलीसह इस्लामपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी तरुणीने वर्दी दिली.संशयित पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.पोलिसांनी त्याला अटक केली आहे.