गेल्या आठवडय़ात हानगल व सिंदगी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला. हानगल मुख्यमंत्र्यांच्या जिल्हय़ातील मतदारसंघ. या मतदारसंघावर काँग्रेसचे श्रीनिवास माने विजयी झाले. ज्यांच्या निधनामुळे सिंदगीत निवडणूक झाली, ते एम. सी. मनगोळी हे निजदचे आमदार होते. त्यांचा मुलगा अशोक मनगुळी याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या मतदारसंघात सहानुभूती कामाला आली नाही. भाजपचे रमेश भुसनूर विजयी झाले. खरेतर सिंदगी मतदारसंघात भाजपच्या वाटय़ाला पराभव आला असता तरी चालले असते. हानगलमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण पुढच्या सार्वत्रिक निवडणुका बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली होणार, अशी घोषणा भाजप नेतृत्वाने केली असताना आपल्याच जिल्हय़ात आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव व्हावा, हे मुख्यमंत्र्यांसाठी धक्कादायक असेच आहे.
बी. एस. येडियुराप्पा पायउतार झाल्यानंतर बसवराज बोम्माई यांनी प्रशासनावर चांगली पकड बसविली असली तरी अल्पावधीत झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना आपल्याच जिल्हय़ात विजय मिळविता आला नाही. या निवडणूक निकालाचे विश्लेषण वेगवेगळय़ा पद्धतीने केले जात आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हानगलमधील विजय काँग्रेसचा नसून ते श्रीनिवास माने यांचे ते वैयक्तिक यश आहे, असे विश्लेषण केले आहे. तर काँग्रेस नेत्यांनी महागाईला सर्वसामान्य नागरिक कंटाळले आहेत, तेच या निकालातून पहायला मिळते. भविष्यात काँग्रेसच्या हाती कर्नाटकाची सत्ता येणार, हेच या निकालावरून दिसून येते, असे विश्लेषण केले आहे. तर निजदला सिंदगी टिकविता आली नाही. या दोन्ही मतदारसंघात निजद उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. तरीही माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा उत्साह काही कमी झाला नाही. पोटनिवडणुकीत पराभव झाला तर काय झाले? आगामी निवडणुकीत आमचीच सत्ता येणार आहे, असे या नेत्यांनी जाहीर केले आहे.
आजवरचा अनुभव लक्षात घेता पोटनिवडणुकीचा निकाल नेहमी सत्ताधाऱयांच्या बाजूने लागतो. याला काही अपवादही आहेत. सदानंद गौडा मुख्यमंत्री झाल्यानंतर मंगळूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. आता हानगलमध्ये तेच झाले आहे. माजी मंत्री सी. एम. उदासी हे हानगलमधून चारवेळा विजयी झाले होते. त्यांची लोकप्रियताही दांडगी होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सुनेला उमेदवारी द्यावी, अशी मागणी वाढली होती. त्यांचे चिरंजीव शिवकुमार उदासी हे खासदार आहेत. मात्र, पक्षाने अनुकंपाचा विचार न करता मुख्यमंत्र्यांचे मित्र शिवराज सज्जनर यांना उमेदवारी दिली. आपल्या मित्राला निवडून आणण्यासाठी बसवराज बोम्माई यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली. मात्र, हानगलमधील मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला विजयी केले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात श्रीनिवास माने घरोघरी पोहोचले. सर्वसामान्यांची मने जिंकली. ही सेवा मतांच्या रूपाने फळाला आली. हानगलमधील पराभवाचे खापर कोणाच्या डोक्मयावर फोडायचे? याचा विचार सुरू आहे.
या निवडणूक निकालानंतर गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी जय-पराजयाचा स्वीकार खुल्या मनाने करा आणि प्रामाणिकपणे कामाला लागा, असा सल्ला दिला. हानगलच्या निकालापाठोपाठ कर्नाटकात आणखी एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बिट क्वॉईन घोटाळय़ात सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱया सुरू आहेत. हे प्रकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना शेकणार. कारण या प्रकरणात भाजपमधील बडय़ा नेत्यांची नावे आहेत, असे माजी मंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले आहे. याच मुद्दय़ावर बसवराज बोम्माई यांचे मुख्यमंत्रीपदही जाऊ शकते, असे सूतोवाचही त्यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय हॅकर श्रीकृष्णा ऊर्फ श्रीकी याच्याभोवती हे प्रकरण फिरते आहे. राजकीय नेते आणि त्यांच्या मुलांची नावे श्रीकृष्णा बरोबर जोडली जात आहेत. सध्या बेंगळूर पोलिसांबरोबर ईडीकडूनही या क्रिप्टो करन्सी घोटाळय़ाची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण कुठंपर्यंत पोहोचणार? कोणाकोणाचे यात बळी जाणार? कोणते नेते राजकीय पोळी भाजून घेणार? याचा अंदाज बांधणे तूर्त तरी कठीण आहे. कारण हजारो कोटी रुपयांच्या या घोटाळय़ात साऱयांनीच उखळ पांढरे करून घेतले आहे. खरे तर हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री नवी दिल्लीला गेले. त्यामुळे पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांना बोलावून घेतले आहे, अशी चर्चा कर्नाटकात सुरू होती. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही याविषयी माहिती दिली आहे. या घोटाळय़ात काँग्रेस नेत्यांचा सहभाग अधिक आहे. आपण पंतप्रधानांना याची माहिती देणार होतो. मात्र, या प्रकरणात त्यांनी विचारणा केली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. गुरुवारी दिवसभर काँग्रेस नेते व बेंगळूर येथील शांतीनगरचे आमदार एन. ए. हॅरिस व हावेरीचे माजी आमदार रुद्राप्पा लमाणी यांच्या मुलांबरोबर श्रीकृष्णाची मैत्री होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. तपास यंत्रणांनी न्यायालयात दाखल केलेल्या जबानीत ही गोष्ट उघडकीस आली आहे. याच मुद्दय़ावरून बिट क्वाईन घोटाळय़ात काँग्रेसचा हात आहे, असा आरोप केला जात आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लवकरच या घोटाळय़ात भाजप नेत्यांचा सहभाग कसा आहे? हे पुराव्यानिशी उघड करू, असा इशारा दिला आहे. पुढील महिन्यात बेळगाव येथे होणाऱया हिवाळी अधिवेशनात हाच मुद्दा गाजणार, याची सर्व लक्षणे दिसून येत आहेत. बिट क्वॉईनचा घोटाळा कुणाला शेकणार, हे तपासाअंतीच स्पष्ट होणार असले तरी सध्यातरी राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे नागरिकांची करमणूकच होत आहे.








