प्राप्तिकर छाप्यातील माहिती उघड – 40 जणांच्या नावे सबकॉन्टॅक्ट
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेहिशेबी मालमत्ता आणि करचुकवेगिरी प्रकरणी मागील आठवडय़ात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. या छाप्यात तब्बल 750 कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता आढळून आली आहे, अशी माहिती प्राप्तिकर अधिकाऱयांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
7 ऑक्टोबर रोजी कर्नाटकासह चार राज्यांमध्ये 47 ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. येडियुराप्पा आणि त्यांचे पुत्र विजयेंद्र यांचे निकटवर्तीय असणारे कंत्राटदार आणि लेखा परीक्षकांच्या निवासस्थानावरील छाप्यात मोठय़ा प्रमाणात घबाड आढळले होते.
कारवाईवेळी तीन कंपन्यांनी बोगस खरेदी बिले तयार करून कामे केल्याची कागदपत्रे बनविली आहेत. याद्वारे मोठय़ा प्रमाणात लाभ मिळविला आहे. या कंपन्यांनी 380 कोटी रुपये कामगार खर्च दाखविला आहे. बेकायदा 750 कोटी रुपयांपैकी 487 कोटींचे उत्पन्न बेहिशेबी असल्याची कबुली कंपन्यांनी दिली आहे. 40 जणांना नावे पाणीपुरवठा, महामार्ग योजनेतील उपकंत्राट घेऊन गैरव्यवहार करण्यात आल्याचेही छाप्यावेळी आढळून आले आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. शिवाय चौकशीवेळी बोगस कागदपत्रे तयार करण्यात आल्याची कबुलीही सबकॉन्टॅक्टरांनी प्राप्तिकर अधिकाऱयांपुढे दिल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे.
येडियुराप्पांचा साहाय्यक म्हणूक काम केलेल्या उमेश याच्यासह तिघांच्या निवासस्थानांवरही धाडी टाकण्यात आल्या होत्या. एका कंत्राटदाराच्या निवासस्थानी 4 कोटी 49 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच 8 कोटी 67 लाख रुपयांचे बेकायदा सोने, 29 लाख 83 हजार रु. किमतीची चांदी जप्त करण्यात आली आहे.









