अहमदाबाद / वृत्तसंस्था
कॅरेबियन भूमीत आयसीसी यू-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱया भारतीय युवा संघाचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱया वनडे लढतीदरम्यान युवा संघातील खेळाडू ब्लेझरमध्ये उपस्थित राहिले. त्यांच्यासमवेत मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर व सहायक पथकातील अन्य सदस्यही हजर होते.
बीसीसीआय सचिव जय शाह, खजिनदार अरुण धुमल, राज्य संघटनेचे काही वरिष्ठ पदाधिकारी, तसेच संघासमवेत कॅरेबियन दौऱयावर असणारे माजी फलंदाज, राष्ट्रीय अकादमी अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण यांची यावेळी मुख्य उपस्थिती होती. भारताने वयोगटातील ही विश्वचषक स्पर्धा जिंकलेल्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी 40 लाख रुपये व सहायक पथकातील सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले.
भारतीय युवा संघ विश्वचषक जेतेपदानंतर मंगळवारी मायदेशात दाखल झाला. या संघाने दि. 5 रोजी झालेल्या निर्णायक फायनलमध्ये इंग्लिश संघाचा 4 गडी राखून धुव्वा उडवत पाचव्यांदा जेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती.









