स्पर्धेतील प्राथमिक फेरीसाठी 16 पंच, 3 सामनाधिकाऱयांची नियुक्ती
वृत्तसंस्था/ दुबई
17 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत सुरू होणाऱया 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पंच व सामनाधिकाऱयांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात अनिल चौधरी या एकमेव भारतीय पंचांना स्थान मिळाले आहे.
54 वर्षीय अनिल चौधरी यांनी आतापर्यंत 20 वनडे व 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचांचे काम पाहिले असून त्यात सध्या सुरू असलेल्या भारत-लंका मालिकेतील सामन्यांचाही समावेश आहे. दिल्लीचे रहिवाशी असलेल्या चौधरी यांनी अनेकदा यू-19 विश्वचषक स्पर्धेत पंचगिरी केलेली आहे. आयसीसीने दिलेल्या निवेदनानुसार, इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या पुरुषांच्या वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर अनुभवी इयान गोल्ड यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेतली. पण आगामी स्पर्धेत लंकेविरुद्ध होणाऱया भारताच्या सलामीच्या सामन्यासाठी त्यांची पंच म्हणून नियुक्ती केली आहे. 12 विविध देशांच्या एकूण 16 पंचांची निवड करण्यात आली असून यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकाला पाच सामने मिळणार आहेत तर आठजण टीव्ही पंचांची भूमिकाही पार पाडणार आहेत.
आयसीसीने या स्पर्धेसाठी तीन सामनाधिकाऱयांची निवड केली असून त्यात लंकेचे माजी वेगवान गोलंदाज ग्रीम लेब्रॉय, द.आफ्रिकेचे शैद वडवाला, इंग्लंडचे फिल व्हिटिकेस यांचा समावेश आहे. 17 जानेवारी रोजी यजमान द.आफ्रिका व अफगाणिस्तान यांच्यात होणाऱया उद्घाटनाच्या सामन्यात अनुभवी वेन नाईट्स व रवींद्र विमलासिरी पंचांचे काम पाहणार आहेत. रशिद रियाझ वकार पहिल्या 48 सामन्यांसाठी टीव्ही पंचाचे काम पाहणार आहेत. बाद फेरीसाठी पंच व सामनाधिकाऱयांची निवड संघ निश्चित झाल्यानंतर करण्यात येणार आहे. प्लेट विभाग आणि सुपरलीग अंतिम फेरीसाठी पंचांची निवड उपांत्य फेरीनंतर केली जाणार आहे.
निवडण्यात आलेले पंच : रोलँड ब्लॅक, अहमद शहा पक्तीन, सॅम नोगास्की, शर्पुद्दौला इब्ने शाहिद, इयान गोल्ड, वेन नाईट्स, रशिद रियाझ वकार, अनिल चौधरी, पॅट्रिक बोन्गनी जेले, आयनो छाबी, निगेल डुगुइड, रवींद्र विमलासिरी, मसुदुर रेहमान मुकुल, असिफ याकूब, लेस्ली रीफर, ऍड्रियन होल्डस्टॉक.
सामनाधिकारी : ग्रीम लेब्रॉय, शैद वडवाला, फिल व्हिटिकेस.









