वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेत गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात यूपी योद्धा संघाने यू मुम्बा संघाचा 35-28 अशा सात गुणांच्या फरकाने पराभव करत प्ले ऑफ गटात प्रवेश केला आहे.
यूपी योद्धा संघातर्फे सुरिंदर गिलने 8 गुण तर आशुसिंग, शुभम कुमार आणि सुमित यांनी प्रत्येकी 3 गुण नोंदविले. या सामन्यात यू मुम्बा संघातील प्रमुख रायडर्स अजितकुमार आणि अभिषेक सिंग यांना दर्जेदार कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत प्लेऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी यू मुम्बा संघाला विजयाची नितांत गरज होती. पण आता या पराभवामुळे त्यांचे प्लेऑफ गटात स्थान मिळविण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.
दोन्ही संघातील बचावफळीत खेळणारे कबड्डीपटू आक्रमक दिसत होते आणि ते बोनस गुण मिळविण्यासाठी झगडत होते. मध्यंतराला एक मिनिट बाकी असताना यूपी योद्धा संघाने यू मुम्बा संघाचे सर्व गडी बाद केले. मध्यंतरावेळी यूपी योद्धा संघाने यू मुम्बा संघावर 18-12 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील खेळाच्या सातव्या मिनिटाला यू मुम्बा संघाने यूपी योद्धा संघाचे सर्व गडी बाद केले. त्यामुळे हा सामना अधिकच रंगतदार झाला. दोन्ही संघ 20-20 असे बरोबरीत होते. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना सुरिंदर गिलने आपल्या चढाईवर यूपी योद्धा संघाला तीन महत्त्वाचे गुण मिळवून दिले. पाच मिनिटांचा कालावधी बाकी असताना यूपी योद्धा संघाने यू युम्बा संघावर केवळ एका गुणाची आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर सुरिंदर गिल, शुभम कुमार आणि सुमित यांच्या शानदार कामगिरीमुळे यूपी योद्धा संघाने यू मुम्बा संघाचे आव्हान सात गुणांच्या फरकाने संपुष्टात आणले.









