ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात मंगळवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पहिल्यांदा 7 जणांचा या स्फोटात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मलब्याखाली अजून एकाचा मृत्यूदेह सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भयंकर होता की यामध्ये दोन घरे जमीनदोस्त झाली. या मलब्याखाली 14 लोक अडकले होते. पोलिसांच्या मदतीने गावकऱ्यांनी या लोकांना बाहेर काढले परंतु, तोपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांत 2 पुरुष, 2 महिलांसह 4 लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.
पोलीस महानिरीक्षक राकेश सिंह यांनी सांगितले की,उत्तर प्रदेशच्या 112 या हेल्पलाईन क्रमांकावर दुर्घटनेची सूचना वझिरगंज पोलिसांना मिळाली होती. स्फोटाचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.
- मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच तत्काळ घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.