ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशच्या शामली येथील बुटराडा गावात एका फटाक्यांच्या कारखान्यात आज दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात काही कामगारांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, मृतदेहांच्या अक्षरशः चिंधडय़ा उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्याला वेग आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटराडा गावातील रहिवासी रिझवान बेकायदेशीरपणे फटाके बनवत असे. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास काही मजूर त्याच्या कारखान्यात फटाके बनवण्यात गुंतले होते. त्याचवेळी अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की मृतदेहांच्या चिंधडय़ा उडाल्या. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. या स्फोटात काही कामगारांचा मृत्यू झाला असून, त्याचा आकडा अद्याप समोर आला नाही.









