वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या वर्षीची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्यात येणार असल्याने आयोजकांना बरेच काम लागणार आहे. मात्र यातील सामने फक्त तीनच केंद्रावर होणार असल्याने त्यांच्यावर नजर ठेवणे काहीसे सोपे जाणार असल्याचे मत बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे (एसीयू) अध्यक्ष अजित सिंग यांनी व्यक्त केले आहे.
यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलमधील सामने दुबई, शारजाह, अबु धाबी येथील स्टेडियमवर होणार आहेत. 51 दिवसात एकूण 60 सामने होणार आहेत. ‘यूएईमध्ये केवळ तीनच स्टेडियम्सवर सामने होणार असल्याने एसीयूला त्यावर लक्ष ठेवण्याचे कार्य करणे भारताच्या तुलनेत जास्त सोपे जाणार आहे. भारतात हे सामने आठ केंद्रावर खेळविले गेले असते. त्यामुळे आमच्यासाठी ही अडचण ठरणार नाही. अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आमच्या कामाची आखणी सुरू केली जाईल,’ असे अजित सिंग म्हणाले. 2014 मध्ये भारतात सार्वजनिक निवडणुका झाल्या. त्यावेळी आयपीएलचा पूर्वार्ध यूएईमध्ये घेण्यात आला होता. बीसीसीआयकडे सध्या आठ एसीयू ऑफिसर करारबद्ध आहेत,’ असेही सिंग यांनी सांगितले.
60 सामन्यांवर लक्ष ठेवण्यास तेवढे अधिकारी पुरेसे ठरतील का, असे विचारता, तेथील जैवसुरक्षित वातावरणावर ते अवलंबून असेल, असे त्यांनी सांगितले. ‘यासंदर्भात आताच बोलणे घाईचे ठरेल. तेथील जैवसुरक्षिततेची स्थिती काय असेल, त्याची आधी माहिती घ्यावी लागेल आणि तेथील परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही आमच्या अधिकाऱयांची नेमणूक करणार आहोत. जादा माणसांची गरज लागल्यास आणखी नियुक्त्या केल्या जातील,’ असेही त्यांनी सांगितले. आयसीसीचे मुख्यालय दुबईतच असल्याने गरज पडल्यास बीसीसीआय त्यांची मदत घेऊ शकेल. त्यांच्याकडे एसीयू अधिकाऱयांचा मोठा ताफा असल्याने बीसीसीआय त्यांची तात्पुरत्या करारावर नियुक्ती करू शकते. लीगचे आयोजन करणाऱयांना त्यांचा खर्च सोसावा लागतो, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
बीसीसीआयला जादा अधिकाऱयांची गरज लागण्याची शक्यता आहे. कारण नियमानुसार प्रत्येक संघासाठी एका इंटेग्रिटी ऑफिसरची नियुक्ती करणे सक्तीचे असते. आयपीएल दरम्यान बीसीसीआय त्यांच्या नियुक्ती संदर्भात निर्णय घेईल, असे एका अधिकाऱयाने स्पष्ट केले. यूएई हे सट्टेबाजांचे आणि मॅचफिक्सर्सचे नंदनवन असल्याचे इतिहास सांगतो. पण आयपीएल तेथे होणार असले तरी आवश्यक माहिती गोळा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा आत्मविश्वास एसीयू प्रमुख अजित सिंग यांनी व्यक्त केला.









