वृत्तसंस्था/ मिलान
सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात युवेंट्स संघाने जिनोआचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. पोर्तुगालच्या रोनाल्डोने या सामन्यात दोन गोल नोंदविले. युवेंट्स संघाकडून रोनाल्डोचा हा 100 वा सामना होता.
या सामन्यात युवेंट्स संघातर्फे पावलो डिबेलाने 57 व्या मिनिटाला गोल नोंदविला. चालूवर्षीच्या या लीग फुटबॉल हंगामातील त्याचा हा पहिला गोल ठरला. त्यानंतर जिनोआतर्फे एकमेव गोल स्टिफॅनो स्टुरेरोने नोंदविला. सामन्यातील शेवटच्या 20 मिनिटाच्या कालावधीत पोर्तुगालच्या ख्रिस्टीयानो रोनाल्डोने पेनल्टीवर दोन गोल नोंदवून जिनोआचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत रोनाल्डोने आतापर्यंत 10 गोल नोंदविले असून त्याने एसी मिलान संघातील इब्राहीमोव्हिकच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोनाल्डोचा युवेंट्स क्लबकडून हा 100 वा सामना होता. स्पर्धेच्या गुणतक्त्यात युवेंट्स आता चौथ्या स्थानावर आहे. नापोली तिसऱया स्थानावर आहे. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात इंटर मिलान संघाने कॅगलेरीचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत गुणतक्त्यात दुसरे स्थान घेतले आहे. नापोली संघाने सँपोडोरियावर 2-1 अशी मात केली.









