ऑनलाईन टीम / पुणे :
सध्याच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात वाढते आजार व त्यावरील होणाऱ्या उपचाराचा खर्च मोठा आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने वायफळ गोष्टींवर पैसे खर्च करण्यापेक्षा समाजोपयोगी कार्य करायला हवीत. आजची परिस्थिती पाहता समाजाला युवकांची गरज आहे. त्यामुळे युवा पिढीने समाजकार्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.
नारायणदास फाउंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन शुक्रवार पेठेत करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन टिळक यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे शहर भाजप संघटन सरचिटणीस राजेश पांडेे, नगरसेवक राजेश येनपुरे,दिपक पोटे, गायत्री खडके, मनीषा लडकत, प्रितम राजाभाऊ तुंगतकर, आयोजक प्रतिक गुजराथी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रतिक नितीन गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रतिक गुजराती म्हणाले, आरोग्य तपासणी शिबिराअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच महिलांसाठी देखील विविध तपासण्या यावेळी करण्यात आल्या. हाडांची ठिसूळता तपासणी, वजन, उंची स्थूलता तपासणी रक्तदाब तपासणी आदी तपासणी यावेळी करण्यात आल्या. प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. मंदार देव यांनी यावेळी मार्गदर्शन केले, यांच्यासह डॉ.वरुण निवर्गी, डॉ. विवेक देशमुख यांनी तपासणी केली. यावेळी 178 नागरिकांची तपासणी झाली. सूत्रसंचालन सारंग सराफ यांनी केले.








