जोकोव्हिच, फेडरर, नदालचा 40 लाख डॉलर्सचा निधी, प्रत्येकी 10 हजार डॉलर्स मदत देणार, भारताच्या 6 खेळाडूंना लाभ अपेक्षित
वृत्तसंस्था / लंडन
कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जगभरातील फ्युचर, चॅलेंजर, एटीपी, ग्रँडस्लॅम या सारख्या सर्वच स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सामनेच होत नसल्याने व्यावसायिक टेनिसपटूंची कमाईसुध्दा बंद झाली आहे. टेनिस सामने व स्पर्धांतून होणारी कमाई हेच त्यांचे कमाईचे साधन आहे. पण आता कमाईच बंद झाली असल्याने याचा फटका विशेषतः क्रमवारीत अडीचशेच्या खाली असलेल्या खेळाडूंना मोठय़ा प्रमाणावर बसला आहे. विशेष म्हणजे, आगामी सहा महिन्यात तरी ही परिस्थिती सुधारणार नसल्याने अशा खेळाडूंच्या मदतीसाठी टेनिस क्षेत्रातील दिग्गज जोकोव्हिच, नदाल व फेडरर पुढे आले असून अशा खेळाडूंसाठी 40 लाख डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचा मदतनिधी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
भारताच्या 6 युवा टेनिसपटूंना याचा लाभ मिळेल, असे संकेत आहेत. जोकोव्हिच हा एटीपीच्या प्लेअर कौन्सिलचा चेअरमन आहे. त्याने या मदतनिधी प्रस्तावाचे पत्र एटीपीच्या सर्व टेनिसपटूंना पाठवले. मी, नदाल आणि फेडरर यांनी एक योजना आखली आहे. त्यानुसार पुरुष एकेरी पहिल्या शंभरातील खेळाडू व दुहेरीतील पहिले 20 खेळाडू हे मदतनिधीसाठी योगदान देतील. 250 ते 700 क्रमांकाच्या खेळाडूंसाठी मदतीची योजना आहे. एटीपीने यासाठी 10 लाख डॉलर्सचा निधी दिला असल्याचे जोकोव्हिचने नमूद केले आहे.
टेनिसपटूंचे भवितव्य अधांतरी
सध्या जागतिक टेनिसमध्ये पहिल्या अडीचशे क्रमांकापर्यंत असणाऱया टेनिसपटूंची आर्थिक घडी चांगली आहे. पण 250 च्या पुढे असणाऱया टेनिसपटूंसमोर स्पर्धाच बंद असल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. या खेळाडूंना आता मदत केली नाही तर त्यांचे करिअर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला युवा खेळाडू हे व्यावसायिक टेनिसचा पाया आहेत आणि यामुळे अव्वल पाच खेळाडूंनी प्रत्येकी 30 हजार डॉलर्स, सहा ते दहा क्रमांकाच्या खेळाडूंनी 20 हजार डॉलर्स, अकरा ते वीस क्रमांकांच्या खेळाडूंनी 15 हजार, एकवीस ते पन्नास क्रमांकांच्या खेळाडूंनी 10 हजार, एक्कावन ते शंभर क्रमांकांच्या खेळाडूंनी 5 हजार डॉलर्स तर दुहेरीतील पहिल्या वीसमधील खेळाडूंनी प्रत्येकी 5 हजार डॉलर्स देण्याचे आवाहन जोकोव्हिचने केले आहे.
युवा टेनिसपटूंना प्रत्येकी 10 हजार डॉलर्सची मदत देण्यासाठी प्रयत्नशील
एटीपीच्या आवाहनानंतर जवळपास 40 ते 45 लाख डॉलर्स रक्कम जमेल असा अंदाज असल्याचे जोकोव्हिचने सांगितले. यामधून 250 ते 700 क्रमांकाच्या खेळाडूंना प्रत्येकी 10 हजार डॉलर्सची मदत करण्याची योजना आहे. याशिवाय रॉजर, राफा आणि जोको यांनी वर्षअखेरीस लंडन येथे होणाऱया वर्ल्ड टूर फायनल्सची अर्धी बक्षिस रक्कम खेळाडू मदतनिधीला देण्याचा प्रस्ताव एटीपीला दिला आहे.