प्रतिनिधी /शिरोडा
सण उत्सवांबरोबरच समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचे परिणाम संवेदनशील कलाकारांच्या कलाकृतीतून वेळोवेळी उमटले आहेत. मानवजातीवर ओढवलेले कोरोना महामारीचे संकट आणि हल्लीच गोव्यातील काही भागांना बसलेला महापुराचा जबर तडाखा याचे प्रतिबिंब भूमेश नाईक व दर्शन नाईक या युवा कलाकारांनी साकारलेल्या भव्य अशा रांगोळीतून उमटले आहे. बोरी येथील प्रतिभा प्रेन्ड्स सर्कलच्या सभागृहात गणेश चतुर्थीनिमित्त तब्बल सोळा फुटांची ही लक्षवेधक अशी रांगोळी रेखाटून या दोन्ही कलाकारांनी गणेश चतुर्थीनिमित्त सामाजिक संदेश दिलेला आहे. बुधवारी दुपारी त्यांनी ही रांगोळी घालायला सुरुवात केली होती.
चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी ती पूर्ण झाली. 11 ते 16 सप्टेंबर असे पुढील सहा दिवस ती लोकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. या रांगोळीच्या माध्यमातून कोरोना महामारीसंबंधी प्रतिकात्मक आकृत्या रेखाटण्यात आल्या आहेत. महापुरात अडकलेली एक माता आपल्या लहान मुलाला उराशी कवटाळून पाण्यातून वाट शोधताना दिसते. कोरोना काळात ज्या आरोग्य कर्मचाऱयांनी आघाडीवर सेवा दिली त्यांनाही या रांगोळीत दाखविण्यात आले असून आपत्तीमुळे हतभल झालेल्या माणसाचा चिंतामग्न चेहरे त्यात दिसतो. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने समाजावरील ही सर्व विघ्ने दूर व्हावीत असे साकडे घालणारा पुजारी या रांगोळीतून साकारण्यात आला आहे. याशिवाय मागील दोन वर्षे शाळा बंद असल्याने, त्या पुन्हा सुरु व्हाव्यात अशी प्रार्थना करणारा एक छोटा मुलगाही या रांगोळीत दिसतो. भूमेश नाईक हा उसगाव येथील असून दर्शन नाईक हा कोडार येथील आहे. यापूर्वी या दोन्ही युवा कलाकारांनी रांगोळीमधून अनेक प्रसंग व व्यक्तीरेखा जिवंत केलेल्या आहेत. गणपती बाप्पांचे आगमन व गोव्यावर ओढवलेली संकटे दूर व्हावीत असा संदेश या कलाकृतीमधून त्यांनी दिला आहे.









