प्रतिनिधी / मडगाव
एका युवतीच्या हाताचा चावा घेतल्याप्रकरणी गांधी मार्केटमध्ये काम करणारा आणि बेताळभाटी येथील मार्टीन्स कॉर्नरजवळ राहणाऱया ओंकार कोटे (25) या युवकाला न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. मडगाव पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खारेबांद येथील पुजा नावाच्या एका 26 वर्षीय युवतीच्या वरील संशयित आरोपीने हाताचा चावा घेतला होता. आपल्या भावासाठी कपडे खरेदी करण्यासाठी म्हणून ती युवती गांधी मार्केटमध्ये गेली होती.
तेथे किरकोळ प्रसंगावरुन वाद झाल्यानंतर सदर युवती व तिचा छोटा भाऊ मुख्य रस्त्यावर थांबले असता संशयित मुख्य रस्त्यावर आला व तेथे भावाला मारहाण करु लागला. सदर युवती मध्ये पडली असता वरील संशयिताने तिच्या हाताचा चावा घेतल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते.
संशयित ओंकार कोटे (25) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 324, 354, 323, 504,506(2) कलमाखाली गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली होती व नंतर न्यायालयाने अनेक अटी घालून त्याला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.









