काणकोणातील घटना, पासल – अर्धफोंड येथील युवकाला अटक, तालुक्यात संतापाची लाट
प्रतिनिधी / काणकोण
पैंगीण परिसरातील एका युवतीचे अपहरण करून विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी पासल-अर्धफोंड येथील प्रतीक महेश नाईक या युवकाला अटक करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी काणकोणच्या न्यायालयाकडून 2 दिवसांचा रिमांड मागून घेण्यात आला असल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. युवतीचे अपहरण करणे, विनयभंग, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करणे असे गुन्हे प्रतीकविरुद्ध नोंदविण्यात आले असून काणकोणचे पोलीस पुढील तपास करत आहेत.
सदर युवक दक्षिण गोवा भाजप समितीच्या एका पदाधिकाऱयाचा सुपुत्र असल्यामुळे या ठिकाणी सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रारीनुसार, ही घटना 17 रोजी घडली. काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर युवक 17 रोजी संध्याकाळच्या दरम्यान सदर युवतीच्या घराजवळ जाऊन तिला बोलावू लागला. युवती रस्त्यावर येताच आपल्या हातातील कडय़ाने तिच्यावर त्याने जबरदस्त प्रहार केला. तसेच युवतीला शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवून तो पसार झाला. जंगलमार्गातून जात असताना सदर युवकाने या युवतीला मारहाण केली आणि तिला तसेच तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. परत येत असताना दोघेही दुचाकीवरून खाली पडले आणि दुखापत झाली.
भाजप पदाधिकाऱयांनी धमकी दिल्याचा आरोप
सदर युवतीला मारहाण करण्यात आल्याची खबर मिळताच मुलीचे वडील पोलीस स्थानकावर आले असता स्वतः मुलीने सदर युवकाने आपला विनयभंग, अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दिली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या काणकोण भाजप मंडळ समितीच्या काही पदाधिकाऱयांनी आपल्याला धमकी देऊन प्रकरण मागे घेण्याची मागणी केली, असा आरोप युवतीच्या वडिलांनी केला आहे. आपली ही एकुलती एक मुलगी असून ती सध्या महाविद्यालयात दुसऱया वर्षात शिकत आहे. आपल्या मुलीवर जसा अत्याचार झालेला आहे तसा तो इतरांवर होता कामा नये. आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काणकोण काँग्रेसकडून निषेध
या प्रकाराने काणकोण तालुक्यात गोंधळ निर्माण झाला असून या प्रकाराबद्दल सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काणकोण गट काँग्रेस समितीने या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आसाम, बिहारसारख्या राज्यांत घडणाऱया गोष्टी आता काणकोण महालात व्हायला लागल्या असल्याची टीका करून या निंद्य प्रकाराचा गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव जनार्दन भंडारी, काणकोण गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रलय भगत, उमेश तुबकी, क्लेस्टन व्हिएगश यांनी काणकोणच्या पोलीस स्थानकावर आल्यावेळी निषेध केला. यावेळी लोलयेचे सरपंच व काणकोण भंडारी समाज अध्यक्ष सचिन नाईक, रूपेश परवार, मिथील च्यारी आणि अन्य उपस्थित होते.
युवतीवर इस्पितळात उपचार
सदर युवतीची 18 रोजी परीक्षा असल्याने तिच्या वडिलांनी तिला इस्पितळातून सकाळी घरी नेले. मात्र तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव व्हायला लागल्यामुळे तिला परत इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सध्या सदर युवती काणकोणच्या इस्पितळात उपचार घेत आहे.
चौकशीत हयगय झाल्यास प्रखर आंदोलन : नाईक
दरम्यान, काणकोण येथील युवतीचा विनयभंग आणि तिच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी काणकोण पोलिसांनी चौकशीत कोणतीही हयगय केल्यास प्रखर आंदोलन करण्याचा इशारा गोवा फॉरवर्डच्या प्रशांत नाईक यांनी दिला आहे. या प्रकरणी अटक झालेला युवक हा भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण गोवा विभागाच्या उपाध्यक्षांचा मुलगा असून या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप होण्याचा संभव आहे. असा प्रकार घडल्यास गंभीर परिणाम पोलिसांना भोगावे लागतील. अटक केलेल्या युवकाविरुद्ध ज्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात ढिलेपणा केल्यास अश्लिल चित्रफीतप्रकरणी जसे आंदोलन करण्यात आले होते त्याची पुनरावृत्ती करावी लागेल, असा इशारा नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न हाणून पाडले दरम्यान, 17 रोजी संध्याकाळी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी काणकोणच्या पोलीस स्थानकावर संपर्क साधून हे प्रकरण मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काही जागरूक नागरिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला, अशी माहिती मिळाली आहे. काणकोणचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज देविदास पुढील तपास करत आहेत. यासंबंधी दक्षिण गोवा भाजप उपाध्यक्ष महेश नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.









