प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रचंड मेहनत घेत असलेल्या पोलीस दलाला नागरिकांकडून सलाम केला जात आहे. जनता आणि पोलिसांमध्ये तयार झालेले भावबंध किती अतूट असतात याचे उदाहरण पोलीस दलालाच मिळाले ते एका घटनेवरुन. सहाय्यक फौजदार बंदोबस्तावर असताना त्यांचा किंमती मोबाईल गडबडीत रस्त्यावर पडला. तो सापडल्यावर मात्र ज्या युवकाला तो सापडला त्याने तातडीने संपर्क करत तो त्यांना पोलीस ठाण्यात परत दिला आणि मग युवकाचे पोलिसांनी कौतुक केले. सहाय्यक फौजदार भोसले बंदोबस्ताच्या गडबडीत असताना सकाळी त्यांचा मोबाईल बुधवार नाका येथे पडला. तो शनिवार पेठेतील युवक अश्विन दिलीप पोतदार याला सापडला. क्रमांकांवरुन शोध घेत मोबाईल शाहुपुरी पोलीस ठाण्यात आणून दिला. त्याच्या प्रामाणिकपणाचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्यासह कर्मचाऱयांनी अभिनंदन केले.









