प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथील युवकाच्या अपहरण प्रकरणातील फरारी आरोपींचा अद्याप थांगपत्ता लागला नाही. चौघा जणांना अटक करण्यासाठी एपीएमसी पोलिसांनी प्रयत्न चालवले असले तरी त्यांचा निश्चित ठावठिकाणा सापडला नाही. दोघा जणांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशीही करण्यात येत आहे.
हुबळी येथील रविकिरण भट्ट (वय 34) या उद्योजक युवकाचे 14 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर तीन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. मात्र, खानापूर तालुक्मयातील एका पोल्ट्रीफार्मवजा फार्महाऊसमधून या युवकाने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली होती. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
पोलिसांनी खानापूर, बेळगाव, गोवा येथे कारवाई करून आठ जणांना अटक केली आहे. आणखी चौघे जण फरारी असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. युवकाच्या अपहरण प्रकरणात रोज नवनवीन माहिती बाहेर पडत असून फरारी असलेल्या चौघा जणांना अटक झाल्यानंतरच या प्रकरणावर प्रकाश पडणार आहे.









