कल्लेहोळ क्रॉसजवळील खूनप्रकरण : आठ दिवसांनंतरही आरोपींचा तपास नाही
प्रतिनिधी /बेळगाव
कल्लेहोळ क्रॉसजवळ अज्ञातांनी बिअरच्या बाटलीने हल्ला करून खून केलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा अद्याप तपास लागला नाही. जेवणाच्यावेळी धाब्यावर झालेल्या वादावादीतून खुनाचा हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली असून गुन्हेगारांचा अद्याप शोध लागला नाही.
रामचंद्र लक्ष्मण कणबरकर (वय 32, रा. उचगाव) असे त्या युवकाचे नाव आहे. गुरुवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी कल्लेहोळ क्रॉसजवळ रामचंद्र गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी दसऱयाच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.
सीसीटीव्हीवरून तपास
बुधवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता रामचंद्र आपल्या घरातून बाहेर पडला होता. रात्री वेंगुर्ला रोडवरील एका धाब्यावर तो जेवणाला गेला होता. धाब्यावर मित्रांबरोबर झालेल्या भांडण व वादावादीनंतर खुनाचा हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास हाती घेतला आहे. आठ दिवसानंतरही आरोपींना अटक झाली नाही.
खुन्यांना कधी अटक होणार?
उपलब्ध माहितीनुसार रामचंद्रचा खून कोणी केला? याचा उलगडा झाला आहे. मात्र पोलीस अद्याप गुन्हेगारांपर्यंत पोहोचले नाहीत. अलीकडे अनेक खून प्रकरणांचे तपास रखडले आहेत. अधिकारी काही प्रकरणे गांभीर्याने घेत नाहीत म्हणून गुन्हेगार माजले आहेत. रामचंद्रच्या खुन्यांना कधी अटक होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.









