प्रतिनिधी / आचरा:
नदीवर, समुद्रात गणपती मूर्तींचे विसर्जन करताना निर्माल्य, प्लास्टिकच्या वस्तू, सजावटीचे सामान तसेच घनकचरा नदीपात्रात टाकला जात असे. त्यामुळे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असे. प्रदूषण रोखण्यासाठी येथील युवकांनी आचरापार नदी व समुद्र किनाऱयावर आचरा ग्रामपंचायतीमार्फत निर्माल्य कुंड बनवून गणेशोत्सवात होणारे प्रदूषण रोखण्याचा स्तुत्य उपक्रम या वर्षी राबविला.
दरवषी गणेश विसर्जन करताना आचरापार नदी व समुद्र किनाऱयावर पाण्यात निर्माल्य, कचरा टाकला जात असे. यावेळी त्यावर उपाय म्हणून आचरा नदीवर पर्यावरणप्रेमी पत्रकार परेश सावंत, आयटी क्षेत्रातील विवेक गुरव, पत्रकार उदय बापर्डेकर, राजू घाडी, कमलेश देसाई, अनिकेत घाडी आदींनी निर्माल्य कुंड बनविले. आचरा समुद्र किनाऱयावर सरपंच प्रणया टेमकर यांच्या सहकार्याने पोलीस पाटील जगन्नाथ जोशी व जीवरक्षक रसिक जोशी यांनी निर्माल्य कुंड बसवित निर्माल्य कुंडात टाकण्याचे आवाहन केले होते.
भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
वाढत्या प्रदूषणाचे गांभीर्य ओळखत आचरावासीय व तमाम गणेशभक्तांना निर्माल्य कुंडाचा वापर करण्याचे आवाहन केल्यावर सहकार्य करीत नदी व समुद्र किनाऱयावरील तयार करण्यात आलेल्या निर्माल्य कुंडात निर्माल्य टाकून नदी व समुद्र किनारा परिसरात होणारे प्रदूषण टाळण्यात मोठा वाटा उचलला. भाविकांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल सरपंच प्रणया टेमकर, पत्रकार परेश सावंत, विवेक गुरव व उदय बापर्डेकर यांनी भाविकांचे आभार मानले.









