बद्रीनाथ, उत्तराखंड येथील सौमेश पोवार करणार कन्याकुमारीपर्यंत जागृती
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या युवकांमध्ये नैराश्य व व्यसनाधीनता वाढत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यातील नैराश्य दूर करून सुदृढता वाढविण्यासाठी एक युवक उत्तराखंड ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करीत आहे. 2 हजार 700 कि.मी.चा सायकल प्रवास करत सोमवारी सकाळी तो बेळगावमध्ये दाखल झाला. अजून 1 हजार 200 कि.मी.चा प्रवास करून तो कन्याकुमारीला पोहोचणार आहे.
सौमेश पोवार हा युवक बद्रीनाथ, उत्तराखंड येथील असून तेथे युवकांना ऍडव्हेंचरचे प्रशिक्षण देतो. युटय़ूबवर व्हिडिओ पाहताना एक लष्करी अधिकारी काश्मीर ते कन्याकुमारी सायकलप्रवास करताना त्याने पाहिले. तेथून पेरणा घेऊन त्याने आपणही उत्तराखंड ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करण्याचे ठरविले.
1 नोव्हेंबरपासून प्रवासाला सुरुवात
1 नोव्हेंबरपासून तो उत्तराखंड येथून प्रवासाला निघाला. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र असा प्रवास करत सोमवारी तो बेळगावमध्ये दाखल झाला. दररोज 100 कि. मी. चा टप्पा तो गाठत आहे. प्रत्येक ठिकाणी होणारे स्वागत यामुळे आपण भारावून गेल्याचे तो सांगत होता. हुबळीमार्गे कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास तो करणार आहे. वाटेत भेटेल त्या तरुणांना प्रेरणा देऊन जात आहे.
प्रवासादरम्यान जाणवल्या अनेक अडचणी
प्रत्येक कोसावर संस्कृती, चालीरिती, आहारपद्धती बदलत असल्यामुळे या प्रत्येकाचा जवळून आस्वाद घेता आला. पहिल्यांदाच इतका मोठा सायकल प्रवास करत असल्यामुळे अनेक अडचणीही आल्या. शरीराच्या समस्याही जाणवल्या. परंतु हार न मानता त्याने आपला सायकल प्रवास सुरू ठेवला आहे. बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर जायंट्स गुपचे सदस्य अशोक हलगेकर यांनी त्याचे स्वागत केले.









