फोटेंचे विधिवत पूजन करून विसर्जन
बेळगाव : रिसालदार गल्ली येथील खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील वडाच्या झाडाखाली देवदेवतांचे फोटो ठेवण्यात आल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन काही युवकांनी एकत्रित येऊन हे सर्व फोटो संकलित केले. प्रेम व काचा बाजूला काढून त्यातील फोटोचे जक्कीनहोंड येथे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आल्याने या युवकांचे कौतुक करण्यात येत आहे. घरातील काच फुटलेले व जीर्ण झालेले फोटो नागरिक जागा मिळेल तेथे ठेवत आहेत. बऱयाचवेळा ते कचऱयाशेजारी टाकण्याचे प्रकारही घडत आहेत. रिसालदार गल्ली येथील वडाच्या झाडाखाली असे फोटो ठेवण्यात आले होते. हिंदू देव-देवतांचे फोटो अशा अवस्थेत असल्याने हिंदू बांधवांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे विटंबना होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती. बुधवारी परिसरातील युवकांनी हे फोटो संकलित केले. त्यातील फुटलेल्या काचा व प्रेम बाजूला करून त्या फोटेंचे विधिवत विसर्जन करण्यात आले. लोकनाथ रजपूत, सतीश गव्हाने, संजय पाटील यांच्यासह इतर तरुणांनी हे कार्य केले.









