रोममधील पहिल्या लढतीत प्रतिस्पर्धी तुर्कीचा 3-0 फरकाने धुव्वा
@ रोम / वृत्तसंस्था
युरोपमधील मातब्बर 24 संघांचा सहभाग असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील सलामी सामन्यात इटलीने तुर्कीचा 3-0 असा एकतर्फी फडशा पाडत पूर्ण गुण वसूल केले. तुर्कीने प्रमाणापेक्षा अधिक बचावावर भर दिल्याने इटलीला प्रारंभी कोंडी फोडता येत नव्हती. मात्र, एकदा त्यात यश आले आणि त्यानंतर या लढतीवर पूर्णपणे इटलीचे वर्चस्व राहिले. येथील स्टॅडिओ ऑलिम्पिको स्टेडियमवर रंगलेल्या या लढतीला 16 हजार चाहते उपस्थित राहिले.
तुर्कीकडून 53 व्या मिनिटाला स्वयंगोल झाला व त्यानंतर इम्मोबाईलने 66 व्या मिनिटाला तर इनसिग्नेने 79 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल करत संघाची आघाडी 3-0 अशी भरभक्कम केली. इटलीचा संघ मागील 28 सामन्यांपासून अपराजित असून ही मालिका त्यांनी येथे कायम राखली.
या सामन्यातील पहिल्या सत्रात तुर्कीने फक्त बचावावर लक्ष केंद्रित केले. यामुळे चक्क 53 व्या मिनिटांपर्यंत गोलफलक कोरा राहिला. 53 व्या मिनिटाला मात्र डोमेनिको बेरार्डीच्या क्रॉस फटक्यावर डिफेंडर मेरिह डेमिरलकडून स्वयंगोल झाला. या स्वयंगोलामुळेच इटलीचे खाते उघडले गेले.
त्यानंतर 66 व्या मिनिटाला लिओनार्डो स्पिनॅझोलोचे आक्रमण गोलरक्षक यूगुरकॅनने थोपवले. पण, त्याला चेंडूवर पूर्ण नियंत्रण राखता आले नाही आणि याचा लाभ घेत इम्मोबाईलने गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. त्यानंतर 13 मिनिटातच इनसिग्नेने तुर्कीच्या कमकुवत झालेल्या बचावाचा लाभ घेत संघाला तिसरा गोल मिळवून दिला. इटलीने युरो स्पर्धेतील आपल्या 39 व्या सामन्यात 3-0 अशी एकतर्फी बाजी मारण्याची ही पहिलीच वेळ ठरली. इटलीसाठी तब्बल 5 वर्षांनंतर ही पहिलीच महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यापूर्वी, 2018 फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी ते पात्रता संपादन करु शकले नव्हते









