हंगेरीत चिनी विद्यापीठाच्या स्थापनेला विरोध- हजारो लोक रस्त्यांवर उतरले
वृत्तसंस्था / बुडापेस्ट
हंगेरीत चीनच्या फुदान विद्यापीठाचे कॅम्पस सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. हंगेरी सरकारने चीनच्या दडपणाखाली येत राजधानी बुडापेस्टमध्ये हे कॅम्पस सुरू करण्याची मंजुरी दिली होती असा लोकांचा आरोप आहे. चिनी विद्यापीठाचा कॅम्पस सुरू झाल्यास देशात कम्युनिस्ट विचारसरणीला बळ मिळेल आणि कम्युनिस्ट वरचढ ठरतील असेही विरोधकांचे म्हणणे आहे.
एका महिन्यात युरोपमध्ये चीनला दुसऱयांदा विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. यापूर्वी लिथुआनियाने चीनच्या 17+1 संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. लिथुआनियाने उर्वरित देशांनाही अशाप्रकारचे पाऊल उचलण्याचे आवाहन केले हेत. चीन फाळणीची रणनीति अवलंबित असल्याचा आरोप लिथुआनिया सरकारने केला होता.
हंगेरी सरकारने बुडापेस्टमध्ये चीनच्या फुदान विद्यापीठाचा कॅम्पस सुरू करण्यास मंजुरी दिली होती. याचे काम देखील सुरू झाले होते. पंतप्रधान व्हिक्टर ओरबन यांनी शिक्षणाच्या सुधारणेकरता हा आवश्यक निर्णय असल्याचे म्हटले होते. व्हिक्टर यांना चीनसमर्थक मानले जाते. पूर्वी या निर्णयाला होणार विरोध सौम्य होता. पण आता हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत. चिनी विद्यापीठाला मंजुरी दिल्याने हंगेरीच्या शिक्षणाची गुणवत्ता खालावणार असून याचा थेट प्रभाव पूर्ण युरोपीय महासंघावर पडणार असल्याचा आंदोलकांचा दावा आहे.
विद्यापीठाला देण्यात आलेल्या जागेवर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण केले जाणर होते. चीनमध्ये हुकुमशाही असू शकते, पण हंगेरीत हे शक्य नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. बुडापेस्टचे महापौरही सरकारला विरोध करत असून त्यांनी आंदोलनात भाग घेतला आहे. आमचे सरकार चीनच्या हुकुमशाहीला देशात आणू पाहत आहे, आम्ही हे कधीच होऊ देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चीनसाठी या आंदोलनामध्ये त्रासाचे आणखीन एक कारण आहे. आंदोलनात झळकलेल्या फलकांमध्ये दलाई लामा आणि शिनजियांग प्रांतातील उइगूर मुस्लिमांसोबत होत असलेल्या अत्याचारांचा उल्लेख होता. चीन या दोन्ही मुद्दय़ांवर बचावाच्या भूमिकेत असतो. बुडापेस्टमधील दोन रस्त्यांना दलाई लामा आणि उइगूर मुस्लिमांच्या हुतात्म्यांची नावे देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर जर्गेली कार्कोनी यांनी केली आहे.
हंगेरीतील काही नेते लोकप्रियता मिळविण्यासाठी हे आंदोलन उभे करत आहेत. हे लोक दोन्ही देशांचे संबंध बिघडवू पाहत असल्याचा चीनचा आरोप आहे. मागील आठवडय़ात हाँगकाँगच्या मुद्दय़ावर युरोपीय महासंघ चीनच्या विरोधात निंदा प्रस्ताव आणू पाहत असताना हंगेरी सरकारने विरोध केला होता.









