जगात सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू, वैद्यकीय सुविधा पडताहेत अपुऱया
युरोपात कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले असून या प्रदेशातील जवळपास सर्वच राष्ट्रे यामुळे घोर चिंतेत पडली असल्याचे दिसून येत आहे. बहुतेक प्रगत राष्ट्रांमध्येही वैद्यकीय सुविधा वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अपुऱया पडत आहेत. गेला रविवार ते शनिवार या कालावधीत जगातील सर्वात जास्त कोरोना मृत्यू या खंडात झाले असून रुग्णसंख्याही सर्वाधिक आहे.
या कालावधीत जगात एकंदर कोरोनामुळे जितके मृत्यू झाले, त्याच्या 49 टक्के युरोपात झाले. युरोपची संख्या जगाच्या अवघी 10 टक्के आहे. ते पाहता मृतांचा हा आकडा भयावह आहे, अशी प्रतिक्रिया तेथील तज्ञांनी व्यक्त केली. त्या तुलनेत आशिया आणि आफ्रिकेतील परिस्थिती बरी आहे.
मृत्यूदर अधिक असल्याने भीती

कोरोनाची रुग्णसंख्या युरोप खंडात गेल्या आठवडय़ापूर्वी घसरणीला लागल्याचे समाधानकारक चित्र दिसत होते. जर्मनी आणि फ्रान्स या बडय़ा देशांनी ‘द वर्स्ट इज ओव्हर’ (वाईट काळ मागे पडला आहे) अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तथापि, ती व्यक्त करण्यात त्यांनी घाई केली असे या आठवडय़ात आढळून आले. या आठवडय़ात मृतांची संख्या आणि रुग्णसंख्या यात उच्चांक गाठला गेला. डिसेंबरमध्ये स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनकडे कल
कोरोनाच्या अधीक तीव्र लाटेमुळे युरोपियन देशांची प्रशासने केवळ चिंताग्रस्त झाली आहेत असे नव्हे, तर भयग्रस्त झाली आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याकडे त्यांचा कल वाढत आहेत. निदान शाळा, बाजारपेठा आणि काही महत्वाची आस्थापने बंद ठेवावीत असा विचार त्यांनी चालविला आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या तीन पुढारलेल्या देशांनी तर काही भागांमध्ये लॉकडाऊनसदृश निर्बंध लादले आहेत. प्राथमिक शाळाही विद्यार्थ्यांअभावी बंदच आहेत. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. प्रशासनावर त्यांचा विश्वास नसल्याचेच हे लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आशेचा किरण
परिस्थिती गंभीर असली तरी सारेच काही हाताबाहेर गेलेले नाही, अशी भावना युरोपियन महासंघ आयोगाच्या अध्यक्षा उर्सेला व्हॉन डर लेयन यांनी शुक्रवारी व्यक्त केली. काही देशांमधून शुभसमाचारही येत आहेत. इटली, ग्रीस, स्पेन इत्यादी तुलनेने आर्थिकदृष्टय़ा कमजोर देशांमध्ये कोरोना परिस्थिती फारशी बिघडलेली नाही. ज्या देशांमध्ये रुग्णसंख्या व मृत्यूदर अधिक आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.

लसीबद्दल निराशेचा सूर
युरोप व अमेरिकेतील अनेक औषध निर्मिती कंपन्यांनी कोरोनावरील लस निर्मिती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचल्याचे दावे अनेकदा केले आहेत. तथापि, अद्याप एकाही कंपनीने अशी लस प्रत्यक्ष बाजारात आणून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे हळूहळू लोकांच्या विश्वासाला तडा जात आहे. लस बाजारात येईल तेव्हाच खरे, असे लोक उघडपणे बोलू लागण्याचे दिसत आहे. सध्या चार कंपन्यांच्या लस अंतिम टप्प्यात आहेत.
यंदाचा ख्रिसमस वेगळाच…
कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या ऐन भरातही आता युरोपला ख्रिसमसचे वेध लागले आहेत. हा तेथील सर्वात महत्वाचा वार्षिक महासण असल्याने तो सर्वांकडून साजरा करण्यात येतो. यंदा मात्र लोकांना कोरोनाचे भान राखूनच या आनंदोत्सवात भाग घ्यावा लागेल. कदाचित तो घरात राहूनच साजरा करावा लागणार आहे. रस्त्यावर गर्दी करता येणार नाही. शारीरिक अंतराचा नियम पाळणे अनिवार्य ठरणार तसेच मास्कपासूनही सुटका मिळणार नाही. अशी स्थिती यापूर्वी 100 वर्षांपूर्वीच्या भयानक फ्ल्यूच्या साथीतही आली नव्हती असे बोलले जाते. परिणामी, सर्व देशांनी नागरिकांची मानसिकता यासाठी तयार करण्यासाठी कंबर कसली आहे.









