ऑनलाईन टीम / लखनऊ :
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन घेतले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आत्ताच माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी सध्या विलगीकरणात असून घरीच माझ्यावर उपचार सुरु आहेत.
मागील काही दिवसांपासून जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःची देखील कोरोना टेस्ट करून घ्यावी, तसेच या लोकांनी स्वतःला आयसोलेट करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
अखिलेश यादव यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यांनी आरोग्य कर्मचारी स्वतःचे नमुने घेत असल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता आणि प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते की, उत्तर प्रदेशात कोरोनामुळे जो हाहाःकार माजला आहे, त्याला भाजप सरकार जबाबदार आहे. तसेच येथे कोरोनावर आम्ही नियंत्रण मिळवले आहे, असा खोटा दावा का केला याचे उत्तर द्यावे असे म्हटले आहे.









