ऑनलाईन टीम / लखनऊ :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. त्यानंतर युपी सरकारने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रदेशात आता, 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 18 पेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना 1 मे पासून लसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, कोविड प्रतिबंधासह लसीकरण मोहीम देखील व्यापक करणे देखील महत्वाचे आहे.
- निःशुल्क लसीकरणाचे आदेश
यामुळेच प्रदेशात 18 वर्षांवरील सर्वानाच निःशुल्क लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार आपल्याकडील लसीकरण मोहीम अधिक व्यापक करणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने कार्य योजनेचे नियोजन करून लसीकरण वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही योगी यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, या अंतर्गत आपल्या लसीकरण केंद्रे वाढवली जाणार आहेत. तसेेच वयोगटाप्रमाणे तरुणांचा डाटा तयार करण्याचा आदेश दिला आहेे. तसेच लसीचा पुरवठा लक्षात घेऊन वेळोवेळी आवश्यक लसींची तरतूद केली जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.









