पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा नारा : गंगा एक्सप्रेस वेच्या कार्याचा शुभारंभ
वृत्तसंस्था / शाहजहांपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी गंगा एक्स्प्रेस वे च्या कामाचा शुभारंभ केला आहे. यावेळी बोलताना मोदींनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहेत. उत्तरप्रदेशात आता माफियांवर बुलडोझर चालविला जातो. राज्यातील माफियाराज संपण्याच्या मार्गावर असल्यानेच उत्तरप्रदेशातील जनता आता ‘युपी प्लस योगी, बहुत है उपयोगी’ असे म्हणत आहे. माफियांचे पाठिराखे त्यांची बाजू घेतील तर आम्ही देशाची बाजू मांडणार आहोत असे पंतप्रधानांनी म्हणत योगींची पाठ थोपटली आहे.
2017 पूर्वी राज्यात मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मुलींना शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणेही अवघड ठरले होते. कुठे दंगली अन् जाळपोळ होईल कुणीच सांगू शकत नव्हता. पण मागील साडेचार वर्षांमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने स्थिती सुधारण्यासाठी परिश्रम केल्याचे मोदी म्हणाले.
काही राजकीय पक्षांना देशाच्या वारशाबद्दल समस्या आहेत. देशाच्या वारशापेक्षा त्यांना स्वतःच्या मतपेढीची चिंता सतावते. अशा लोकांना गंगेच्या सफाई मोहिमेबद्दल समस्या आहे, हेच लोक दहशतवाद्यांच्या विरोधातील सैन्याच्या कारवाईवर संशय घेतात. हेच लोक भारतीय वैज्ञानिकांकडून निर्मित लसीला आरोपीच्या पिंजऱयात उभे करतात. याच राजकीय पक्षांना काशीमधील बाबा विश्वनाथचे भव्य धाम झाल्याने समस्या आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर होऊ नये असे या लोकांना वाटते असे म्हणत मोदींनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे.
शेतकऱयांच्या खात्यात थेट अनुदान
दुहेरी इंजिन सरकारचे उत्तरप्रदेशच्या विकासावर पूर्ण लक्ष आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रासह आम्ही उत्तरप्रदेशच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. पूर्वी शेतकऱयांना बँकांमध्ये एंट्री मिळत नव्हती. परंतु आता शेतकऱयांच्या पिकाची एमएसपीवर खरेदी केली जाते आणि याचा पैसा थेट त्यांच्या खात्यात जमा होतो असे मोदी म्हणाले.
36,200 कोटींची गुंतवणूक
गंगा एक्स्प्रेस वे मुळे उत्तरप्रदेशच्या प्रगतीचे नवे द्वार खुले होणार आहे. 36,200 कोटी रुपयांच्या खर्चातून निर्माण होणाऱया 594 किलोमीटर लांबीचा हा गंगा एक्स्प्रेस वे 12 जिल्हय़ांमधून जाणार आहे. या महामार्गावर वायुदलाच्या विमानांना आपत्कालीन टेक-ऑफ आणि लँडिंगमध्ये सहाय्यासाठी 3.5 किलोमीटरची धावपट्टी देखील असणार आहे. हा एक्स्प्रेस वे मेरठ, हापूड, बुलंदशहर, अमरोहा, संबळ, बदायूं, शाहजहांपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ आणि प्रयागराज जिल्हय़ांमधून जाणार आहे. हा महामार्ग 6 पदरी असून जो भविष्यात 8 पदरी केला जाणार आहे.









