राजधानी कीव्हवर कब्जा करण्यासाठी रशियाची धडपड
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याला 27 दिवस पूर्ण झाले आहेत. मोठा काळ उलटल्यावरही रशियाच्या सैन्याला भूमार्गाने पुढे वाटचाल करताना संघर्ष करावा लागतोय. दक्षिण युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर मिळत आहे. युद्ध लांबल्याने आणि जागतिक व्यासपीठांवर बाजूला फेकेले गेल्याने रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची अस्वस्थता वाढली आहे. पुतीन आता छोटे आण्विक हल्ले करू शकतात अशी भीती अमेरिकेचे तज्ञ व्यक्त करत आहेत. पुतीन यांनी आण्विक हल्ल्याची धमकी दिली असून स्वतःच्या आण्विक तुकडीला अलर्टवर ठेवले आहे. रशियाच्या सैन्याने यापूर्वी आण्विक ऊर्जा प्रकल्पावर हल्ले केले आहेत.









