पाण्याअभावी तडफडत 3 मुलांचा मृत्यू ः 3 लाख मुले उपासमारीच्या गर्तेत
सुमारे एक महिन्यापासून सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. एक सुंदर देश आता उद्ध्वस्त दिसू लागला आहे. तेथे राहणारी मुले, वृद्ध, महिला आणि तरुण-तरुणी आकाशातून होणाऱया हल्ल्यांना तोंड देत आहेत किंवा स्वतःचा देश सोडत आहेत. दरदिनी युक्रेनमधून हादरवून टाकणारी छायाचित्रे समोर येत आहेत.
मारियुपोलमध्ये तीन मुलांचा पाण्याअभावी तहानेने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारियुपोल शहरालाच युद्धाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या शहरावर कब्जा करण्यासाठी रशियाच्या सैन्याने चहुबाजूने वेढा घातला आहे. शहरात पाणी, अन्न, औषधे, वीज, गॅस या मूलभूत गरजांचा पुरवठा रोखण्यात आला आहे.
27 वर्षीय व्हिक्टोरिया मारियुपोल शहरात राहत होती. शहरातून बाहेर पडलेल्या व्हिक्टेरियाने रशियाचा क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे. स्वतःच्या नजरेसमोर तीन मुलांना तहानेने व्याकुळ होत मृत्युमुखी पडताना पाहिल्याचा दावा तिने केला आहे.
माझे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. प्रसूती रुग्णालय, चिल्ड्रन वॉर्ड, थिएटर, स्कूल या सर्वांना क्षेपणास्त्रांनी नष्ट केले आहे. लोक तळघरात राहत असून शहरात अन्न आणि पाणी दोन्ही गोष्टींची टंचाई आहे. बहुतांश लोकांकडे अन्न आणि पाणी नाही. तीन मुलांनी डिहायड्रेशनमुळे जीव गमावला आहे. 21 व्या शतकात माझ्या शहरातील मुले तहानेने मृत्युमुखी पडत असल्याचे व्हिक्टोरियाने म्हटले आहे.
90 टक्के शहर उद्ध्वस्त
सुमारे साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या या शहरावर कब्जा करण्यासाठी रशियाने स्वतःची शक्ती झोकून दिली आहे. मारियुपोल हे शहर अजोव्ह समुद्राच्या किनाऱयावर आहे. येथे युक्रेनचे महत्त्वाचे बंदर असून देशाच्या अर्थव्यवस्थेत येथून होणाऱया व्यापाराचा महत्त्वाचा हिस्सा आहे. हे शहर क्रिमिया आणि डोनबास दरम्यान भूमी कॉरिडॉरची भूमिका बजावत आहे. रशियाने सर्वाधिक बॉम्बवर्षाव याच शहरावर केला आहे. मारियुपोलवर रशिया दर 10 मिनिटांनी बॉम्बवर्षाव करत आहे. शहराचा 90 टक्के हिस्सा उद्ध्वस्त झाला आहे.
2500 मुलांचे अपहरण
युक्रेनच्या विदेश मंत्रालयाने रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन याच्यावर डोनबासच्या डोनेट्स्क आणि लुहान्स्कमधून सुमारे 2500 मुलांचे अपहरण करून त्यांना रशियात पाठविण्याचा आरोप केला आहे. तर रशियाच्या सैन्याकडे केवळ तीन दिवसांची रसद शिल्लक असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याकडून करण्यात आला आहे.









