ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भविष्यात युद्धाजन्य परिस्थिती उद्भवल्यास सलग दहा दिवस पुरेल एवढा शस्त्रसाठा भारतीय लष्कराकडे आहे. मात्र, हा शस्त्रसाठा 40 दिवस पुरेल एवढा करण्याची सुरूवात भारतीय लष्कराने केली आहे. लष्कराची ही तयारी पश्चिमेकडील सीमेसाठी होत आहे. रॉकेट्स, मिसाईल्सपासून अत्याधुनिक टँक आणि आर्टिलरी शेल्सच्या वाढीसह भारतीय लष्कराला मजबूत करण्याची पाऊले उचलली जात आहेत.
भारतीय लष्कराकडे सध्या 13 लाख सैनिकांचा फौजफाटा आहे. 2022-23 पर्यंत भारतीय लष्कराला अधिक बलशाली बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. युद्धाजन्य परिस्थिती उद्भवल्यास किमान 40 दिवस पुरेल एवढा शस्त्रसाठा असणे आवश्यक आहे. पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही देशांना समोर ठेऊन या शस्त्रसाठय़ाची जमवाजमव करण्याची गरज आहे. त्यासाठी जवळपास 12 हजार 890 कोटी रुपयांचे 24 करार प्रस्तावित आहेत. यात एकूण 19 परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या करारांचा समावेश आहे.
देशी आणि विदेशी अशा विविध पद्धतीचे लष्करी टँक आणि इतर शस्त्रास्त्र निर्मिती करुन देशाला सक्षम करण्याचा मानस संरक्षण मंत्रालयाचा आहे. त्यासाठी वार्षिक 1,700 कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे.









