पुतीन यांचा मोठा दावा
युक्रेनच्या भूमीवर रशियाचे सैन्य वेगाने पुढे सरकत आहे. तर युक्रेनचे सैनिक पूर्ण शक्तिनिशी प्रतिकार करत आहेत. दोन्ही देशांमधील ही लढाई आता धोकादायक वळणावर पोहोचली आहे. याचदरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्ज यांच्याशी बोलताना मोठा दावा केला आहे. युक्रेनमध्ये अन्य देशांचे भाडोत्री सैनिक आणि दहशतवादी देखील लढत असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
युक्रेनचे सैनिक विदेशींसह लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत. युक्रेन अन्य देशांमधून जिहादी आणि भाडोत्री सैनिकांची मदत घेत युद्ध लढतोय असे पुतीन यांनी सांगितले आहे. रशियाच्या विदेशी गुप्तचर सेवेनुसार पोलंडच्या क्षेत्राचा वापर करणारे ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेच्या विशेष यंत्रणा युक्रेनमध्ये उग्रवाद्यांना पाठवत आहेत.
अलिकडच्या काळात अमेरिका आणि ब्रिटनच्या गुप्तचर सेवांनी पोलंडच्या क्षेत्राला ‘लॉजिस्टिक्स हब’मध्ये रुपांतरित केले असून याचा वापर मध्यपूर्वेसह युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रs आणि परिवहन दहशतवाद्यांना पुरवठा करण्यासाठी केला जात असल्याचा दावा रशियन विदेशी गुप्तचर सेवेने (एसव्हीआर) केला आहे.
नाटो देशांची गुप्तचर यंत्रणा रशियाच्या सशस्त्र दलांविषयी माहिती पुरविण्यासह युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत आहे. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, कॅनडा आणि अन्य नाटो देशांच्या गुप्तचर यंत्रणांचे प्रतिनिधी तेथे तळ ठोकून असल्याचे एसव्हीआरने म्हटले आहे.









