मारुती, टाटा स्टील मोठय़ा नुकसानीत ः निफ्टीही घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी महाशिवरात्री असल्यामुळे सुट्टी राहिली होती. परंतु तिसऱया दिवशी बुधवारी मात्र शेअरबाजाराच्या सत्रात रशिया व युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स जवळपास 700 पेक्षा अधिक अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसभरात सेन्सेक्स 778 अंकांसह 1.38 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 55,468.90 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 187.95 अंकांनी घसरुन निर्देशांक 16,605.95 वर बंद झाला आहे.
शेअर बाजारात बुधवारच्या सत्रात बँकिंग समभागांना मोठा फटका बसला आहे. यासह मारुती सुझुकीचे समभाग 5.9 टक्के तर टाटा स्टीलचे समभाग 5.6 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले आहेत. लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य हे सोमवारी 252.36 लाख कोटी रुपयावर होते. तसेच बुधवारच्या सत्रात हा आकडा 251.75 लाख कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 22 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले असून 8 समभाग वाढीसोबत बंद झाले आहेत. घसरणाऱया समभागात आयसीआयसीआय बँकेचे समभाग 3.43 तर एचडीएफसीचे समभाग 3.3 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले आहेत. यासह एनटीपीसी, एचसीएल, आयटीसी, टीसीएस आणि विप्रोचे समभागदेखील घसरणीसह बंद झाले आहेत. पण इतर कंपन्या वधारल्या आहेत ज्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, घडय़ाळ क्षेत्रातील कंपनी टायटन, ऍक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. अस्थिर वातावरणाचा आगामी काळातही परिणाम राहिल्यास भारतीय बाजारात कोणती स्थिती राहणार हे
आताच सांगणे अवघड असल्याचे तज्ञांचे मत आहे.








