ताजी, टवटवीत, तरुण, तेजस्वी त्वचा प्रत्येकीलाच हवी असते. पण अयोग्य आहार आणि धावपळीच्या आयुष्यामुळे त्वचेकडे फार लक्ष देता येत नाही. मग चेहर्यावर सुरकुत्या, काळपट डाग पडू लागतात. चेहरा निस्तेज दिसू लागतो. पार्लरमध्ये जायला वेळ नसेल किंवा त्वचेची नियमित देखभाल करायची असेल तर तुम्ही लवेंडर ऑईलचा वापर करून फेसपॅक बनवू शकता. लवेंडर ऑईल हे इसेन्शियल ऑईल असून या तेलाचे चार ते पाच थेंब तुमची त्वचा खुलवू शकतात. हे तेल त्वचेचं नुकसानही भरून काढतं.
* लवेंडर ऑईल फेस मास्क बनवण्यासाठी चमचाभर ऍव्हाकॅडोचा गर कुस्करून घ्या. सोबत चमचाभर मध, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि लवेंडर ऑईलचे चार ते पाच थेंब घ्या. सगळे घटक एकत्र करून पॅक बनवा. आता हा पॅक चेहर्याला साधारण अर्धा तास लावून ठेवा. तुमची त्वचा उजळ दिसू लागेल. हा पॅक आठवडय़ातून एकदा लावल्यास चेहर्यावरील सुरकुत्याही कमी होतील.
* चमचाभर दह्यात लवेंडर ऑईलचे थेंब घालून फेस पॅक तयार करता येईल. या पॅकने चेहरा आणि मानेवर मसाज करा. साधारण 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवा. हा उपाय आठवडय़ातून तीन वेळा केल्यास त्वचा टवटवीत आणि उजळ दिसेल. तसंच त्वचेला ओलावाही मिळत राहील.
* दोन चमचे मध, एक चमचा दालचिनी पूड आणि चार ते पाच थेंब लवेंडर ऑईल असं साहित्य घ्या. हे सर्व मिश्रण एकत्र करून पेस्ट बनवा. चेहरा, मान आणि गळ्याला लावा. अर्ध्या तासाने धुवून टाका. दालचिनीतल्या अँटी एजिंग घटकांमुळे तुमची त्वचा बराच काळपर्यंत तरुण दिसेल.
घरच्या घरी करता येणारे हे फेस पॅक्स नियमित वापरता येतील.









