त्यानंतर राष्ट्रवादी निर्णय घेण्यास मोकळा : पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी /मडगाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी आपणास दोन दिवसांपूर्वी तातडीने मुंबईत बोलावून घेतले व काँग्रेस व समविचारी पक्षांशी युतीची बोलणी अजूनही चालू असल्याचे आपणास सांगण्यात आले. 31 ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी वाट पाहिली जाईल अन्यथा नंतर राष्ट्रवादी निर्णय घेण्यास मोकळा असल्याची माहिती बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिली.
वार्का येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आलेमाव यांनी आपल्या पक्षाची बाजू स्पष्ट केली. आपण प्रथम युतीसाठी एक महिन्याची मुदत दिली होती. ती संपल्यानंतर 10 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली. तरी युती होत नसल्यास आपण आपला निर्णय घेण्यास मोकळा असल्याचे आपण स्पष्ट केले होते. सदर मुदतही संपण्यास आल्याने आणि आपण राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची वार्ता काहींनी पसरविल्याने पवार यांनी आपल्याला व वालांका आलेमाव यांना मुंबईत बोलावून घेतले व त्यासंदर्भात विचारणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा आपला विचार नसल्याचे आपण पवार यांना स्पष्ट केले. तेव्हा 31 ऑक्टोबरपर्यंत युतीसाठी वाट पाहूया असे त्यांनी सांगितल्याचे आलेम?ाव यांनी सांगितले.
…तर राष्ट्रवादी 26 जागा लढविणार
काँग्रेस हा मुख्य वृक्ष होता. त्याच्या नंतर राष्ट्रवादी, तृणमूल व अन्य फांद्या पाडल्या गेल्या. ते एकमेकांच्या विरोधात लढल्यास समविचारी मतांची विभागणी होते व ते विरोधकांच्या पथ्यावर पडते. त्यामुळे युती झाल्यास चांगलेच असल्याचा पुनरुच्चार आलेमाव यांनी केला. युती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस किमान 26 जागा लढविणार व त्यासाठी उमेदवार तयार असल्याचा दावा त्यांनी केला.
युती झाल्यास राष्ट्रवादी किती जागांची मागणी करणार तसेच नावेलीत वालांकासाठी उमेदवारी मागितली आहे काय अशी विचारणा केली असता, किती जागा पाहिजेत त्यावर केंद्रीय नेते निर्णय घेतील, असे आलेमाव यांनी सांगितले. वालांका अजूनही काँग्रेसमध्ये असून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. एखाद्या पक्षाची तिकीट मिळत असल्यास त्यावेळी विचार करू, असे सांगून त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळणे.









