पती-पत्नीची करामत : कोटय़वधी रुपये झाले खर्च
कोरोनामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात बरेच काही बदलून गेले आहे. दोन वर्षांमध्ये लोकांनी घरात राहून अनेक कामे हातावेगळी केली, बरेच काही नवे शिकून घेतले. यातील काही जणांनी आव्हाने स्वीकारत ती पूर्ण केली आहेत. एका कुटुंबाने मागील दोन वर्षांमध्ये घरबसल्या विमानच तयार केले आहे. युटय़ूबवरील व्हिडिओज पाहून त्यांनी किमया केली आहे.
पूर्ण कुटुंबाने केले काम
38 वर्षीय अशोक, त्यांची 35 वर्षीय पत्नी अभिलाषा दुबे, 6 वर्षीय मुलगी तारा आणि 3 वर्षीय मुलगी दीया या चौघांनी मिळून यावर काम केले. अशोक एक कुशल वैमानिक आणि इंजिनियर देखील आहेत. त्यांनी कुटुंबासोबत मिळून 2 वर्षांमध्ये हे विमान तयार केले आहे.

पत्नीची होती इच्छा
हे कुटुंब इंग्लंडच्या एसेक्समध्ये राहते. अभिलाषा यांची एक विमान खरेदी करण्याची इच्छा होती. परंतु ती पूर्ण न झाल्याने अशोक यांनी स्वतःच विमान तयार करण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबाने यात सहकार्य केले. त्यांनी युटय़ूबवरील व्हिडिओज पाहून या चारआसनी विमानाची निर्मिती केली. 2020 मध्ये याचे सुटे भाग मागवत कोरोना काळात त्यावरील काम सुरू केले.
कोटय़वधी रुपयांचा खर्च
हे विमान तयार करण्यास त्यांना 1 लाख 55 हजार युरोंचा खर्च आला आहे. म्हणजे 1.57 कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. सामाजिक कार्यक्रमांमध्ये खर्च होणारा पैसा विमानासाठी गुंतविल्याचे अशोक यांनी सांगितले.
कित्येक तास करायचे काम
अशोक आणि मी ऑफिसचे काम संपल्यावर विमान निर्मितीच्या कामात सामील व्हायचो. हे विमान आम्ही बॅक गार्डनमध्ये तयार केले आहे. दिवसा 3 वाजल्यापसून रात्री 9 वाजेपर्यंत यावर काम करत राहायचो. उन्हाळय़ाच्या सुटीत या विमानातून प्रवास करण्याची योजना असल्याचे अभिलाषा म्हणाल्या.









