भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळकांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचा पाया घातला. त्यांच्या निधनानंतर भारतातील काही नेते व वृत्तपत्रांनी काही अभिप्राय दिले. गांधीजी म्हणाले, ‘टिळक लोकांसाठी जगले व भारतासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले, नारायणराव चंदावरकर म्हणाले, ‘अफाट बुद्धिमत्ता व प्रखर देशभक्ती असणारे असे लोकमान्य होते.
जोपर्यंत तत्त्वज्ञान व ज्ञान या गोष्टी मानवापासून दूर होत नाहीत तोपर्यंत टिळकांचे विचार राहतील असा अभिप्राय ‘द इन्डीपेंडन्स’ या वृत्तपत्राने दिला. ‘भारताचा बलाढय़ पुत्र व आधुनिक भारताचा राष्ट्रनिर्माता’ असे मत अमृतबझार या वृत्तपत्राने दिले. मद्रास येथील ‘द हिंदू’ वृत्तपत्र म्हणते ‘भारताच्या भूतकालीन संस्कृतीचे सर्वोत्कृष्ट व सर्वश्रे÷ उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे टिळक होय.’ लंडनच्या ‘द मॉर्निंग पोस्ट’ने अप्रितीचा पुरस्कर्ता असे टिळकांना म्हटले आहे. योगी अरविंद यांनी असे म्हटले की, ‘टिळक हे मराठी चारित्र्याचे मूर्तरूप आणि दीपस्तंभ होते. बॅ. जीना यांनी ‘टिळक हे नि:स्वार्थी देशभक्त आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्व असलेले होते,’ असे म्हटले होते.
लोकमान्य टिळक यांनी भारतीय राजकारणात व सार्वजनिक जीवनात सुमारे तीन दशके अधिराज्य गाजविले. भारतीय जनतेवर त्यांची जी पकड होती ती वेगळीच होती. भारतीय राजकारणात त्यांचा उदय होण्यापूर्वी ब्रिटीशांची अचाट शक्ती आणि पाश्चात्य संस्कृती यांनी भारतातील काही सुशिक्षित लोक दिपून गेले. त्या लोकांच्या मते ब्रिटीशांची सत्ता हे ईश्वरी वरदान आहे व ब्रिटीशांची न्याय बुद्धी भारताची राजकीय प्रगती घडवून आणील. गोपाळकृष्ण गोखले, न्या. रानडे, दादाभाई नवरोजी, इत्यादींचे प्रयत्न हे सनदशीर मार्गाचे होते. त्यात लोकांचा सहभाग नव्हता. या मार्गाने ब्रिटीशसत्तेवर काहीही परिणाम होणार नाही हे सांगणारे टिळक पहिले नेते होते. राष्ट्राचे मानबिंदू, राष्ट्राचा स्वाभिमान आणि गौरव यासाठी त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवासारख्या उत्सवाना राष्ट्रीय स्वरूप दिले. स्वराज्य हा शब्द प्रथम वापरणारे व स्वदेशी चळवळीला महत्त्व देणारे ते पहिले पुढारी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारण टिळकांनी सुरू केले. न्या. रानडे, भांडारकर या पुढाऱयांशी ते एकटे टक्कर देत होते.
टिळकांची लेखणी, त्यांचे वृत्तपत्र, तसेच व्यासपीठ व लोकांचा सहभाग या मार्गाने त्यांनी आपला लढा सुरू केला. यालाच जहाल विचारसरणी असे म्हणतात. त्यांच्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता, निर्भयता आणि ध्येयावर नि÷ा हे गुण होते. त्यांची वृत्ती बंडखोरीची होती. टिळकांचे अग्रलेख केसरीतून गाजू लागले. आपल्या धारदार लेखणीने ते ब्रिटीश राज्यकारभाराचे वाभाडे काढीत असत. या अग्रलेखामुळे इंग्रजी सरकारला हादरा बसत असे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.’ हे त्यांचे ध्येय होते.
टिळकांचा खरा कालखंड 1905 ते 1920 असा धरला जातो. त्याला जहाल कालखंड असे म्हणतात. टिळक हे ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात बंड उभे करणारे बहुजनांचे भारतीय पुढारीच केवळ नव्हते तर पाश्चात्य साम्राज्यवादाच्या टाचेखाली दबल्या जाणाऱया आशिया खंडातील राष्ट्रांना आणि पुढाऱयांना स्फूर्ती देणारी आशियाई राष्ट्रवादाची धगधगती मशालही होती.
डॉ. ऍनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली टिळकांनी होमरुल चळवळ सुरू केली हेही आंदोलन देशव्यापी ठरले. टिळकांचे सामाजिक विचार हे वेगळय़ा प्रकारचे होते. प्रथम स्वातंत्र्यप्राप्ती मग सामाजिक सुधारणा असे त्यांचे स्पष्ट मत होते. आगरकर, न्या. रानडे, म. फुले यांच्या विचारांना त्यांचा पाठिंबा होता पण सामाजिक सुधारणेचे काम नंतर करता येईल, असे ते सांगत. भारतातील त्यावेळच्या सर्व नेत्यांबद्दल त्यांना नितांत आदर होता. केसरीतील लेखनासंबंधी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व त्यांना 1908 ते 1914 या कालावधीत मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगातून मुक्तता झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय सभेमध्ये एकता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मवाळ, जहाल व मुस्लीम लीग या गटांना त्यांनी एकत्र आणले त्याला लखनौ करार असे म्हणतात. देशातील क्रांतिकारकांबद्दल त्यांना आदर होता व त्यांच्या कार्याला अप्रत्यक्ष पाठिंबा होता.
टिळकांचे संपूर्ण आयुष्य हे देशासाठी खर्ची पडले. त्यांना कौटुंबिक व खासगी जीवन अजिबात नव्हते. अशा या धावपळीच्या जीवनात त्यांनी उत्तम दर्जाचे प्रचंड लेखनही केले. केसरी हे वृत्तपत्र मराठीतून व मराठा वृत्तपत्र इंग्रजीतून त्यांनी सुरू केले. या वृत्तपत्रातून ते ब्रिटीश शासनावर टीकेची झोड उठवीत असत. तसेच त्यांनी ओरायन किंवा वेदांच्या प्राचीनतेतून हा ग्रंथ लिहिला व त्याचाच दुसरा भाग ‘द अर्क्टिक्ट होम इन द वेदाज’ याचे लेखन केले. मंडालेच्या तुरुंगात असताना भगवद्गीतेवरील, भाष्य म्हणून त्यांच्या हातून गीतारहस्य, या एका महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखन झाले. हा ग्रंथ हिंदू व भारतीय संस्कृती तसेच विचारसरणी यांचे दर्जेदार द्योतक आहे.
टिळकांचे कौटुंबिक जीवनही साधे होते. पैशाची आवक कमी होती पण त्याचा त्यांनी कधी विचार केला नाही. त्यांची राहणी साधी असे पण ती छाप पाडणारी असे. घरातील सर्व व्यवस्था त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई पहात असत. ते जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हाच त्यांनी प्रथमच एकदा सूट घातला होता. ते जेव्हा घरात असत तेव्हा वाचनात अथवा चर्चेत गुंतलेले असत. त्यांचा बहुतेक सारा वेळ घराबाहेरच जात असे. त्यांनी वकिली केली असती तर भरपूर संपत्ती मिळविली असती. टिळकांचे वाचन, लेखन, व्याख्याने हे सर्व देशाच्या स्वातंत्र्यासाठीच होते. देशहिताला त्यांनी प्राधान्य दिले. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी सहभाग घेतला नसता तर ते जागतिक ख्यातीचे गणितज्ञ, खगोल शास्त्रज्ञ तसेच जागतिक स्तरावर विविध विषयात तज्ञ झाले असते.
टिळकांनी आपले सर्व आयुष्य देशकार्यासाठी दिले. ते ‘भारतीय असंतोषाचे जनक’ होते. राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविणारे ते पहिले भारतीय पुढारी होते. संततधार पाऊस असूनही त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी प्रचंड जनसमुदाय लोटलेला होता. तत्त्वज्ञान व ज्ञान या गोष्टी मानवापासून दूर जात नाहीत तोपर्यंत टिळकांचे योगदान टिकून राहिल असा अभिप्राय त्यांच्या निधनानंतर ‘द इंडिपेन्डन्स’ या वृत्तपत्राने दिला. भारतमातेचा सर्वात बलाढय़ पुत्र व आधुनिक भारताचा राष्ट्रनिर्माता असा अभिप्राय ‘अमृत बझार’ या वृत्तपत्राने दिला. सामान्य माणसांचा राजा निद्राधीन झाला असे ‘द एक्सप्रेस’ने म्हटले. अशा या थोर व्यक्तीला स्मृती शताब्दी निमित्त आदरांजली.
असा मोहरा कधी न झाला, कधी न होणार
लो. टिळक हे नाव जगामधी गर्जत राहणार!
विलास राजवाडकर, खेड








