युक्रेन आणि रशिया यांच्यात पुन्हा युद्ध थांबविण्यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहे. ही चर्चेची आतापर्यंतची सातवी फेरी असून आजवर कोणत्याही व्यवहार्य तोडगा या दोन देशांमधील संघर्षावर सापडलेला नाही. मात्र, चर्चा सुरु ठेवण्यावर एकमत आहे.

या युद्धाने आता सहाव्या आठवडय़ात प्रवेश केला आहे. एकाचवेळी युद्धात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न, तर दुसऱया बाजूला युद्ध थांबविण्यासाठी चर्चा अशा परस्पर विरोधी वातावरणात अनेक घडामोडी घडत आहेत. रशियाने आपली आक्रमकता काही प्रमाणात कमी केल्याचे स्पष्ट केले. मात्र, अमेरिकेने यावर आपला विश्वास नाही असे प्रतिपादन केले. त्यामुळे या दोन महासत्तांमधील अंतर अधिकच वाढल्याचेही स्पष्ट झाले. युपेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनीही रशियाचा हा बनाव असल्याचे म्हटले असून अविश्वास व्यक्त केला आहे.
प्रथम तीव्रता कमी करा
रशियाने प्रथम युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता कमी करावी. त्यामुळे शांतता चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. नंतर चर्चेवर भर देऊन एक सर्वमान्य तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत अशी सूचना काही तज्ञांनी केली आहे.
रेड क्रॉसला चिंता रशियाने युक्रेनचे एकमेव मोठे बंदर मारुपोल ची नाकेबंदी केली असून तेथून माणसांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करत असल्याचे स्पष्ट केले होते. तथापि, आतापर्यंत असा कोणताही मार्ग उपलब्ध केला गेला नसल्याचे रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रतिपादन केले. कदाचित मारुपोलमधून निरपराधी लोकांचे स्थालांतर कधीच होणार नाही, असे या संस्थेचे म्हणणे आहे.









