संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव यांचे पुतीन यांच्याशी चर्चेपूर्वी प्रतिपादन
संयुक्त राष्ट्रसंघ / वृत्तसंस्था
युक्रेन युद्धामुळे जगाची घडी विस्कटली असून हे युद्ध तत्काळ थांबणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंटोनिओ गुट्रेस यांनी केले आहे. ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्यासाठी रशियाला केले आहेत. त्यापूर्वी त्यांनी युद्ध थांबविण्याचे आवाहन केले.
ही चर्चा बुधवारी होण्याची शक्यता आहे. गुट्रेस पुतीन यांना युद्ध थांबवून शस्त्रसंधी करण्याचे आवाहन करणार आहेत. पुतीन यांनी आता अधिक ताणू नये. या युद्धामुळे जगातील सर्वच देशांना विनाकारण त्रास होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळय़ा या युद्धामुळे विस्कळीत झाल्या असून त्या पुन्हा सुरु होणे आवश्यक आहे. रशियाने हे जाणावे आणि शस्त्रसंधी घोषित करावी, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे मत असून ते पुतीन यांच्या कानावर घातले जाणार आहे.
कीव्हलाही भेट
पुतीन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गुट्रेस युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा करणार आहेत. त्यासाठी ते कदाचित गुरुवारी युपेनला जातील. दोन्ही नेत्यांची चर्चा युक्रेनची राजधानी कीव्ह येथे होण्याची शक्यता आहे. युद्ध थांबविण्याचे आणि चर्चेच्या माध्यमातून मतभेद संपविण्याचे आवाहन ते झेलेन्स्की यांनाही करतील. या चर्चांचा परिणाम येत्या काही दिवसांमध्ये समजणार आहे.









