जेलेंस्कीच्या हत्येसाठी गेलेले चेचेन सैनिक ठार
युक्रेनने रशियाला एक मोठा झटका देत राष्ट्रपती व्लोदिमिर जेलेंस्की यांच्या हत्येसाठी पाठविण्यात आलेल्या क्रूर चेचेन स्पेशल फोर्सेसच्या एका मोठय़ा तुकडीला ठार केले आहे. चेचेनचा हा सशस्त्र समूह स्वतःचे क्रौर्य आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी कुख्यात आहे. 65 रणगाडय़ांच्या त्यांच्या ताफ्याला होस्टोमेलनजीक युक्रेनियन क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केले आहे.
किती सैनिक मारले गेले हे स्पष्ट नसले तरीही त्यांची संख्या शेकडोंमध्ये राहण्याची शक्यता आहे. युक्रेनियन क्षेपणास्त्रांमध्ये चेचेन जनरल मॅगोमेद तुशेव्ह देखील मारला गेल्याचे समजते. तुशेव्ह हा 141 व्या मोटराइज्ड नॅशनल गार्ड ब्रिगेडचा कमांडर होता. हे चेचेन प्रांतप्रमुख रमजाद कादिरोव्ह यांचे विशेष दल मानले जाते.
तुशेव्हला कादिरोव्हसोबत अनेकदा पाहिले गेले होते. कादिरोव्ह समलैंगिक पुरुषांचा छळ करणे आणि त्यांना मारून टाकण्यासाठी कुख्यात आहे. कादिरोव्हने एक दिवसापूर्वीच युक्रेनच्या जंगलांमध्ये स्वतःच्या स्क्वाड्रनचा दौरा केला होता असे मानले जाते. युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये हे सैनिक मारले जाणे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या युक्रेनवर विजय प्राप्त करण्याच्या योजनेवर मोठा आघात आहे.
जेलेंस्कीच्या हत्येचा कट
रशियाच्या राष्ट्रपतींनी युक्रेनचे अध्यक्ष जेलेंस्की यांना पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी हा समूह पाठविला होता. युक्रेनच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान करण्यास तयार असणाऱया जेलेंस्की यांची हत्या झाली असती तर युक्रेनच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असते. चेचेन सैनिकांना ‘हंटर्स’ या नावाने ओळखले जाते. या पथकाच्या प्रत्येक सैनिकाला वरिष्ठ युक्रेनियन अधिकारी आणि काही सुरक्षा अधिकाऱयांची छायाचित्रे देण्यात आली होती.









